Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ऑटो रिक्षा चालकाने परत केले सव्वा दोन लाखाचे दागिने

Spread the love

एका प्रामाणिक रिक्षा चालकाने सव्वा दोन लाखांचे सोन्याचे दागिने मूळ मालकाला परत केले आहेत. भरत जाधव असे या प्रामाणिक रिक्षा चालकाचे नाव असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तर मंगल विश्वास ढेरे यांना त्यांचे साडेपाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने परत मिळाल्याने आनंद व्यक्त केला आहे. यावेळी चिंचवड पोलिसांनी रिक्षा चालक भरत जाधव यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला असून त्यांच्या प्रामाणिक पणाचे कौतुक केले आहे. तसंच जाधव यांचा आदर्श इतर रिक्षा चालकांनी घ्यावा असे पोलीस अधिकारी म्हणाले.

अधिक  माहिती अशी, की मंगल विश्वास ढेरे या शुक्रवारी सायंकाळी दिराच्या वाढदिवसासाठी  पिंपरी-चिंचवड शहरात आल्या होत्या. वाढदिवस झाल्यानंतर त्या परत पुण्यात जाणार होत्या. तेव्हा, त्यांनी चिंचवड येथून रिक्षातून आकुर्डी रेल्वे स्थानका पर्यंत प्रवास केला. याच दरम्यान, साडेपाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने असलेली बॅग रिक्षात विसरल्या. ही बाब त्यांच्या लक्षात आली मात्र तोपर्यंत रिक्षा चालक भरत हे निघून गेले होते. रिक्षाचा काही वेळ शोध घेण्यात आला मात्र ते सापडले नाहीत. संबंधित घटनेची तक्रार निगडी पोलीस ठाण्यात देण्यात आली. दरम्यान, रिक्षा चालक भरत जाधव हे  घरी गेले. रात्रभर सोन्याची दागिने असलेली बॅग रिक्षातच होती.

आज सकाळी रिक्षा चालक भरत हे सहकुटुंब दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी पुण्यात गेले. तेव्हा, त्यांच्या मुलाने रिक्षात बॅग असल्याचे निदर्शनास आणून दिले. बॅगमध्ये पाहिले असता त्यात सोन्याचे दागिने असल्याचे दिसले. त्यांनी अधिक वेळ न दवडता थेट चिंचवड पोलीस ठाणे गाठले. याची माहिती तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे यांना दिली. निगडी पोलिसात तक्रार नोंद झाली असल्याने तात्काळ मंगल ढेरे यांची माहिती पोलिसांना मिळाली त्यांना तात्काळ बोलावण्यात आले. सोन्याचे दागिने पोलिसांच्या समक्ष रिक्षा चालक भरत जाधव यांनी मंगल यांना दिले. प्रवाशांनी आपल्या साहित्यावर लक्ष ठेवले पाहिजे इतक्या मौल्यवान वस्तू वाहनात विसरू नयेत असे आवाहन रिक्षा चालक जाधव केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!