Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

वंचित बहुजन आघाडीतून “एम आय एम ” अखेर बाहेर , युती तुटली

Spread the love

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जागा वाटपात सन्मान राखला नाही, असं सांगत एमआयएमचे नेते, खासदार इम्तियाज जलील यांनी वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकरांना शुभेच्छा देत एमआयएम विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे. लवकरच या पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येतील असे खा. जलील यांनी कळविले आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित आघाडीत फूट पडली आहे.

प्रकाश आंबेडकरांवर हेकेखोरपणाचा आरोप करत माजी आमदार लक्ष्मण माने हे या आधीच वंचित आघाडीतून बाहेर पडले होते. त्यापाठोपाठ आता असाच आरोप करत एमआयएमनेही वंचित आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा केली असल्याने  वंचितसाठी हा फार मोठा फटका असल्याचं मानलं जात आहे.

लोकसभा निवडणुकीत एमआयएमबरोबर हातमिळवणी केल्यानंतरही मुस्लीम मते वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना मिळाली नव्हती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममध्ये जागा वाटपावरून नेत्यांमध्ये धुसफूस चालू होती.  एमआयएमने वंचित बहुजन आघाडीकडे ७७ जागांची मागणी केली होती परंतु त्यांना केवळ ८ जागा देण्यात येतील असे प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाचे नेते खा . असदुद्दीन ओवैसी यांना कळविण्यात आल्याची माहिती खा. इम्तियाज जलील यांनी दिली आहे. त्यामुळे एमआयएम ने अखेर आघाडीतून बाहेर पडत स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याने आघाडीसमोर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमध्ये अखेर फूट पडली असून एमआयएमकडून विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा करण्यात आली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे हि माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकरांनी आमचा मान राखला नसल्याची खंत व्यक्त केली.

एमआयएमने वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे ९८ जागांची मागणी केली होती. पुढे त्यात बदल करून किमान ७४ जागा तरी द्याव्यात, अशी विनंती केली होती. पण दोन वेळा चर्चा होऊनही जागांबाबतचे निर्णय होऊ शकला नव्हता. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांच्यात दोनवेळा बैठका झाल्या, तर खासदार इम्तियाज जलील यांच्याबरोबर तीन बैठका झाल्या. जागा वाटपाचा तिढा न सुटल्यामुळे एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीत काडीमोड होण्याची शक्यता वर्तविली जात होती.

दलित-मुस्लीम ऐक्य घडल्यास राजकीय समीकरणे बदलू शकतात असे सांगत लोकसभा निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी विशेष सभा घेतली होती. या सभेनंतर एमआयएने कधीही आक्रमक भूमिका घेतली नाही. उलट प्रकाश आंबेडकर हे आमचे नेते आहेत, ते जे सांगतील तसेच होईल, असे एमआयएमचे नेते सांगत होते.

गेल्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमने २४ जागा लढविल्या होत्या. त्यापेक्षा अधिक जागा मिळाव्यात यासाठी सुरू करण्यात आलेल्या बोलणीला फारसे यश येत नसल्याचे सांगण्यात येत आहे. अलिकडेच प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद येथे मुस्लीम तरुणांची स्वतंत्र बैठक घेतली होती. तत्पूर्वी एमआयएमने मागितलेल्या जागांबाबत आपण खूश नाही, असा संदेश देणारे वक्तव्य केले होते. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीतून एमआयएमला बाजूला सारले जाण्याची शक्यता अधिक असल्याचे सूत्रांनी सांगितले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!