Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आर्थिक घोटाळ्याच्या आरोपावरून अटकेत असलेल्या शिवकुमार यांना ९ दिवसांची कोठडी

Spread the love

मनी लाँड्रिंगप्रकरणी अटक करण्यात आलेले काँग्रेसचे संकटमोचक डीके शिवकुमार यांची ९ दिवसांसाठी ईडीच्या कोठडीत रवानगी झाली आहे. ईडीने शिवकुमार यांची १४ दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र कोर्टाने ही मागणी फेटाळून लावत त्यांची १३ सप्टेंबपर्यंत कोठडीत रवानगी केली. तसेच शिवकुमार यांची जामीन याचिकाही फेटाळून लावली आहे.

आयकर विभागाने शिवकुमार यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले असता काही रक्कम आणि दस्ताऐवज हाती लागल्याचं अतिरिक्त सॉलिसिटर जनरल के. एम. नटराजन यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. शिवकुमार यांना ईडीने अटक केली आहे. त्याच्याकडे सापडलेल्या रोख रकमेवरून त्यांची संपत्ती प्रचंड प्रमाणात वाढल्याचं सिद्ध होत आहे. शिवाय त्यांच्या मेव्हण्याची साक्ष नोंदवण्यात आली आहे. त्यांच्या संपत्तीच्या वाढीचं प्रकरण महत्वाच्या टप्प्यावर असल्याचंही नटराजन यांनी सांगितलं. आरोपीची चौकशी करायची असल्याने त्यांना कोठडी मिळावी. अनेक आरोपींची त्यांच्यासमोरच चौकशी करायची आहे. शिवाय शिवकुमार चौकशीला सहकार्य करत नसल्याचंही त्यांनी कोर्टाला सांगितलं. तर शिवकुमार यांच्या वकिलाने रिमांडला आव्हान देणारी आणि जामिनासाठीच्या अशा दोन याचिका कोर्टात दाखल केल्या होत्या.

दरम्यान, शिवकुमार यांचे वकील अभिषेक मनू संघवी यांनी शिवकुमार यांच्या बचावाचा बराच प्रयत्न केला, मात्र कोर्टाने त्यांचे युक्तिवाद मान्य केले नाहीत. दरम्यान, शिवकुमार यांना रोज अर्धा तास त्यांचे वकील आणि कुटुंबीयांना भेटण्याची मुभा देण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!