Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पी. चिदंबरम नंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डीके शिवकुमार यांना ईडीकडून अटक, कर्नाटकात खळबळ

Spread the love

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना ईडीने अटक केलेली असतानाच मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीने कर्नाटकातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डीके शिवकुमार यांना अटक केली आहे. काँग्रेसचे संकटमोचक म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिवकुमार यांना अटक करण्यात आल्याने कर्नाटक काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.

मनी लाँड्रिंगप्रकरणी काल तिसऱ्यांदा ईडीने काँग्रेस नेते, आमदार शिवकुमार यांची चौकशी केली. त्यानंतर त्यांना आज ईडीने अटक केली आहे. उद्या त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं. ३० ऑगस्ट रोजी शिवकुमार पहिल्यांदा ईडीसमोर हजर झाले होते. ईडीने पाठविलेल्या समन्सला शिवकुमार यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे त्यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागले होते. या चौकशी दरम्यान त्यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते. २०१७मध्ये गुजरातमध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकी दरम्यान आमदारांच्या सुरक्षेची काळजी घेतल्यामुळेच राजकीय दबावातून माझ्यावर कारवाई करण्यात येत आहे, असं शिवकुमार यांनी म्हटलं होतं.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये शिवकुमार यांच्यासह नवी दिल्लीतील कर्नाटक भवनमधील कर्मचारी हनुमंथैया यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आयकर विभागाने शिवकुमार यांच्याविरोधात कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्राच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवकुमार यांनी हवाला मार्फत कोट्यावधी रुपयांची देवाण-घेवाण केल्याचा आरोप या आरोपपत्रात करण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!