Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

चर्चा महायुतीची : भाजपकडून जागावाटपावर चर्चा करण्यासाठी ठरले दोन नेते तर सेना नेते म्हणतात ” युतीचा निर्णय उद्धव ठाकरेच घेतील “

Spread the love

विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होईल कि नाही याची चर्चा रंगली असतानाच  या पार्श्वभूमीवर “युती आणि जागा वाटपाचा निर्णय अमित शहा , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी आम्ही तिघेच घेणार” असे शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः म्हटले होते तर आता भाजपकडून  युती होणार असल्याचं स्पष्ट केलं जात असतानाच भाजप स्वबळवार लढणार या केवळ अफवा असल्याचं सांगितलं जात आहे. येत्या १० दिवसांमध्ये जागावाटपाची चर्चा होणार असून भाजपतर्फे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे शिवसेनेशी वाटाघाटी करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन नेत्यांवर चर्चेची जबाबदारी सोपवली असल्याचे वृत्त आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी युती आणि जागा वाटप या विषयी आम्ही तिघेच निर्णय घेणार या म्हणण्याला ब्रेक बसला आहे.

दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर ” युती होणार कि नाही ? याचा निर्णय उद्धव ठाकरेच घेतील अशी गुगली शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी टाकली आहे.

राज्यात २८८ जागांवर महायुतीचे उमेदवार हाच आमचा फॉर्म्युला असल्याचं मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलंय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मुंबईत होते. त्यांनी सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. त्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सोलापूरमध्ये सांगता झाली. त्यामुळेच आता जागावाटपावर जास्त लक्ष केंद्रित केलं जाईल, असे वृत्त आहे.

मागची विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेनेने वेगवेगळी लढवली होती. त्यातल्या काही जागा भाजप आणि शिवसेनेच्या पारंपरिक जागा आहेत. पण काही जागांवरून भाजप आणि शिवसेनेत वाटाघाटी सुरू आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा रविवारी रात्री सोलापूरमध्ये समारोप झाला. यावेळी झालेल्या जाहीर सभेत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी सभा संपताना त्यांनी देवेंद्र फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री बनविण्यासाठी मतदान करा असं आवाहन करत शिवसेनेवर दबावही निर्माण केल्याचं बोललं जातंय.

दरम्यान मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू असतानाच शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंचं नाव पुढे केलं जातंय. सत्तेची वाटणी सम-समान होणार असंही सांगितलं जातंय. तर सोलापूरच्या सभेत अमित शहा यांनी भाजप-सेना युतीचं सरकार येणार असं सांगितलं मात्र मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच असतील असंही स्पष्टपणे जाहीर केलं. त्यामुळे शिवसेनेच्या दबावाचा परिणाम होणार नाही असंही स्पष्टपणे त्यांनी सांगून टाकंलं.

रविवारच्या अमित शहा यांच्या सभेतील वक्तव्यानंतर भाजपमध्ये पुढच्या ४-५ दिवसांत मेगाभरती होणार आहे, असं भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. अनेक जण पक्षात यायला उत्सुक आहेत पण युती असल्याने इनकमिंगला मर्यादा आहेत, असंही ते म्हणाले. दरम्यान भाजपला २४० पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे, असा अंदाजही त्यांनी वर्तवला असून काँग्रेस – राष्ट्रवादीची स्थिती या निवडणुकीत गंभीर होईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

एकीकडे भाजप सेनेची युती होणारच असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच भाजपचे सगळे नेते म्हणत असताना युती संदर्भातला निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेत असतात असं वक्तव्य शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलंय. तसंच आमच्याकडे चर्चा करण्याची पद्धत नसून आवडो किंवा न आवडो पक्षप्रमुख जो निर्णय घेतात तो अंतिम असतो असं रावते यांनी म्हटलंय. भाजपच्या नेत्यांना उत्तर म्हणून रावते यांनी हे वक्तव्य केल्याचं म्हटलं जातंय. राज्यात भाजपसाठी अनुकूल वातावरण असल्यानं भाजपकडून दबाव निर्माण केला जातोय असं शिवसेनेला वाटतं. त्यामुळे रावते यांनी हे वक्तव्य केलं असण्याची शक्यताही व्यक्त केली जातेय.

आता विधानसभा निवडणूक जवळ आल्यानंतर युती होणार की नाही याबद्दल शंका निर्माण केली जातेय. भाजपने केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्ये स्वबळावर निवडणूक लढल्यास बहुमत मिळण्याची शक्यता व्यक्त केली गेली होती. त्यामुळे भाजप ऐनवेळी स्वबळाचा नारा देऊ शकते असंही बोललं जातंय. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनीदेखील युती म्हणूनच निवडणुका लढवल्या जातील असं सांगितलंय. त्या पार्श्वभूमीवर रावतेंच्या वक्तव्यांना महत्त्व प्राप्त झालंय.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!