Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

P. Chidambaram : सर्वोच्च न्यायालयाचाही दणका , जमीन अर्जाचे अपील फेटाळले, कोर्टाकडून पुन्हा चार दिवसांची सीबीआय कोठडी

Spread the love

माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम INX मीडिया खटल्यात CBI च्या कोठडीत आहेत. आता सुप्रीम कोर्टानेही त्यांना दणका दिला आहे. दिल्ली हायकोर्टाने जामीन रद्द केल्याच्या विरोधात चिदंबरम यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. कोर्टाने मात्र त्यांचं अपील फेटाळून लावलं आहे. ‘दिल्ली हायकोर्टाने चिदंबरम यांना जामीन नाकारला ते योग्यच आहे. चिदंबरम आधीच CBI च्या कोठडीत आहेत. त्यामुळे चिदंबरम यांच्या या याचिकेला काही अर्थ नाही’, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. दरम्यान  पी. चिदंबरम यांना चार दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. येत्या ३० ऑगस्ट रोजी त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे चिदंबरम यांच्यासाठी हा मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे.

पी. चिदंबरम यांच्या CBI कोठडीची मुदत आज संपत आहे. आता त्यांना CBI च्या कोर्टात सादर केलं जाईल. या कोर्टात CBI त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करू शकतं. पी. चिदंबरम यांच्यावर INX मीडिया खटल्यातल्या कारवाईचा फास आता आवळत चालला आहे. या खटल्यात INX मीडियाची प्रमोटर इंद्राणी मुखर्जी सरकारी साक्षीदार बनल्यामुळे चिदंबरम यांच्या अडचणी वाढल्या.

इंद्राणीने तिच्या जबाबात म्हटलं होतं, पीटर मुखर्जी यांनी चिदंबमरम यांच्याशी चर्चा सुरू केली आणि INX मीडिया चा परकीय गुंतवणुकीचा अर्ज चिदंबरम यांच्याकडे सोपवला. या परवानगीच्या बदल्यात पीटर मुखर्जी यांनी कार्ती चिदंबरम यांना मदत करावी, असं चिदंबरम यांनी सांगितलं. इंद्राणी मुखर्जीचा हा जबाब ईडी ने आरोपपत्रात लिहिला आहे आणि कोर्टासमोरही तो पुरावा म्हणून सादर करण्यात आला. कार्ती चिदंबरम यांची संपत्ती INX मीडिया प्रकरणी मिळालेल्या लाचेच्या रकमेतून खरेदी करण्यात आली, असा आरोप आहे.

चिदंबरम यांना आज दुपारी सव्वा तीनच्या सुमारास राउज अॅव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी सीबीआयचे अधिकारी आणि दिल्ली पोलीस उपस्थित होते. त्यावेळी चिदंबरम यांची अधिक चौकशी करायची असल्याने पाच दिवसांची रिमांड देण्यात यावी, अशी मागणी सीबीआयने कोर्टाला केली. त्यावेळी गेल्या चार दिवसांत तुम्ही काय चौकशी केली? असा सवाल कोर्टाने सीबीआयला केला. त्यावर गेल्या चार दिवसांत आम्ही चिदंबरम यांना सर्व कागदपत्रे दाखवली. त्याचं रेकॉर्डिंगही केलं. तसेच या प्रकरणातील एका आरोपीला आजच त्यांच्यासमोर हजर केलं. मात्र ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. आणखी एक-दोन आरोपींना त्यांच्यासमोर हजर करून काही प्रश्न विचारायचे असल्याचं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितलं. तसेच २६ तासांच्या चौकशीनंतर चिदंबरम यांना एफआयपीबीच्या गाइडलाइनबाबत विचारलं असता कागदपत्रं वाचावी लागेल, असं सांगून ही कागदपत्रे वाचण्यासाठी चिदंबरम एक-एक तास घेत असल्याचंही मेहता यांनी सांगितलं.

दरम्यान, मेहता यांच्या युक्तिवादानंतर कोर्टाने २० मिनिटाने निर्णय देताना चिदंबरम यांच्या कोठडीत ३० ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. सीबीआयने चिदंबरम यांना पाच दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली होती, मात्र कोर्टाने चार दिवसांची कोठडी सुनावली आहे. दरम्यान, चिदंबरम यांना त्यांचे वकील आणि कुटुंबीयांना रोज अर्धा तास भेटण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच येत्या ४८ तासांत त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!