Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

“कावळे आणि मावळे ” नेमके कोणाला बोलले शरद पवार ?

Spread the love

आज अनेक लोक पक्ष सोडत आहेत. ज्यांच्यावर केसेस आहेत, त्यांच्यावर राज्यकर्ते दबाव आणत असल्याने हे पक्षांतर सुरू आहे. त्यामुळे पक्षगळती होत आहे. मात्र तुम्ही स्वच्छ असल्याने तुम्हाला चिंता करायची गरज नाही, असं सांगतानाच आता कावळ्याची चिंता करायची नाही, तर मावळ्यांची चिंता करायची, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्ष कार्यकर्त्यांना दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला विभागाची बैठक पार पडली. या बैठकीला संबोधताना शरद पवार यांनी हा सल्ला दिला. देश चहूबाजूंनी संकटात आहे. आपला पक्ष हा विकासासोबत अन्यायावर मात करणारा पक्ष आहे. यासाठी संघटन मजबूत करणं गरजेचे आहे. यातून पक्षाला आणि राज्यालाही मोठा फायदा होणार आहे, असं पवार यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत तरुणांना आणि महिलांना पुढाकार देण्याच्या सूचना केल्या. विधानसभा निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा पक्ष विचार करेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

राज्यात पूरपरिस्थिती नंतर अनेक मदतीचे हात पुढे आले. मात्र आपल्या पक्षाने सर्वाधिक मदत केल्याचा आनंद आहे. संकटाच्या काळात जो उभा राहतो त्याला लोक विसरत नाही. यासाठी आपण पक्षाच्या संघटनेकडे लक्ष घालणे गरजेचे आहे, हे कार्यकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.

महिलांवरील अत्याचार व विकृत मनस्थितीवर जरब बसवणारी यंत्रणा ढिसाळ झाली आहे. राज्यकर्ते महिलांना सन्मानाने वागणूक देत नाहीत ते यंत्रणा काय चालवणार?, असा सवाल करतानाच महाराष्ट्राची दुसरी राजधानी नागपूर हे आज गुन्हेगारीचे केंद्र बनले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिथलेच आहेत. या साऱ्यांविरोधात आवाज उठवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांमध्ये आहे, असं ते म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!