Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Jammu & Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये इंटरनेट, लँडलाइन सेवा सुरु.

Spread the love

5 ऑगस्टला केंद्र सरकारने  कलम 370 हटविल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये इंटरनेट, फोन सेवांवर निर्बंध लावण्यात आले होते. हळूहळू या सेवांवरील निर्बंध हटविण्यात येत आहेत. सोमवारपासून राज्यातील शाळा-कॉलेज उघडण्यात येणार आहेत. तर आजपासून इंटरनेट, फोनसेवा सुरु करण्यात आली आहे. जम्मूमध्ये 2 जी सेवा सुरु करण्यात आली आहे. तर काश्मीरमध्ये लँडलाइन सेवा सुरु करण्यात आली आहे.

काश्मीरमध्ये 17 लँडलाइन सेवा शनिवारपासून सुरु करण्यात आली आहे. राज्यातील 100 हून टेलिफोन एक्सचेंज सेवांमधील 17 ऑपरेटर्सना सुविधा सुरु करण्याची सूट दिली आहे. श्रीनगर जिल्हा, सिव्हिल लाइन्स, छावणी परिसर, विमानतळाजवळील सेवा सुरु करण्यात आली आहे. उत्तर काश्मीरात गुरेज, तंगमार्ग, उरी केरन, करनाह आणि तंगधार येथील सेवा सुरु करण्यात आली आहे. तर दक्षिण काश्मीरात काजीगुंड आणि पहलगाम या परिसरात फोन सेवा सुरु केली आहे.

काश्मीरातील सुरक्षेचा विचार करता अद्याप 5 जिल्ह्यांमधील या सेवांवर बंदी कायम ठेवली आहे. त्याचसोबत सीआरपीएफ, जम्मू काश्मीर पोलीस, सैन्याचे जवान यांना अतिसंवेदनशील परिसरात तैनात ठेवण्यात आलं आहे. शुक्रवारी मुख्य सचिव सुब्रमण्यम यांनी काश्मीर खोऱ्यात फोन सेवा शनिवारपासून सुरु करण्याचं जाहीर केलं होतं. राज्यातील 22 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यात परिस्थिती सर्वसामान्य असल्याचे ही ते म्हणाले. शनिवारी मिळालेल्या माहितीनुसार जम्मू काश्मीरातील उधमपूर, रियासी, कठुआ, सांबा आणि जम्मू शहरांतील 2 जी इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली आहे. त्याचसोबत या परिसरात कोणतेही निर्बंध लावण्यात आले नाहीत. काश्मीरमधील इंटरनेट सेवा सुरु करण्याचा निर्णय कायदा-सुव्यवस्था परिस्थिती पाहूनच निर्णय घेतला जाईल, तसेच ज्या लोकांना ताब्यात घेतलं आहे त्यांची सुटकाही परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर विचार करण्यात येईल असं अधिकाऱ्यांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!