Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

“प्राण्यासारखं आम्हाला पिंजऱ्यात ठेवलंय”, मेहबुबा मुफ्तींच्या मुलीचं अमित शाह यांना पत्र

Spread the love

जम्मू काश्मीरमधील निर्बंध अद्याप शिथील करण्यात आलेले नसून अनेक पक्षांचे नेते अजूनही अटकेत आहेत. दोन माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान मेहबुबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा जावेदने एक ऑडिओ मेसेज रिलीज केला असून, आपल्याला ताब्यात घेण्यात आलं असून घरात बंदिस्त ठेवण्यात आलं असल्याची माहिती दिली आहे. तसंच आपण जर पुन्हा प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देण्यात आल्याचंही म्हटलं आहे. इल्तिजाने आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून स्पष्टीकरण मागितलं असल्याची माहिती दिली आहे.

इल्तिजाने अमित शाह यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, “आज जेव्हा देशभरात सगळीकडे स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे, काश्मिरींना जनावरांप्रमाणे कैद करुन ठेवण्यात आलं आहे. त्यांना मुलभूत मानवाधिकारांपासून वंचित ठेवलं जात आहे”.

इल्तिजाने रिलीज केलेल्या ऑडिओ मेसेजमध्ये सांगितलं आहे की, “मला ताब्यात घेण्यात आलं आहे. कर्फ्यू लागू करण्यात आल्यानंतर काश्मिरींना काय सहन करावं लागत आहे याबाबत मी प्रसारमाध्यमांशी संवाद साधल्याने ताब्यात घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. जर मी पुन्हा प्रसारमाध्यमांशी संवाद साधला तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देण्यात आली आहे. मला एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे वागणूक दिली जात असून, वारंवार माझ्यावर नजर ठेवली जात आहे. ज्या काश्मिरींना विरोध केला आहे, त्यांच्यासोबत मलादेखील जीवाची भीती वाटू लागली आहे”.

जम्मू काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हवण्यात आल्यानंतर मेहबुबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्स नेते ओमर अब्दुल्ला यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं आणि नंतर अटक करण्यात आलं. यानंतर त्यांना श्रीनगरमधील एका गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आलं आहे.

इल्तिजाने याआधी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आपलं म्हणणं मांडलं होतं. त्यात तिने सांगितलं होतं की, “दोन दिवसांपासून आपल्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. परिस्थती अशी आहे की, कोणालाही घराबाहेर जाऊ दिलं जात नाही आहे. अनेकांना घऱकैदेत ठेवण्यात आलं आहे. येथे काय सुरु आहे ? हे प्रसारमाध्यमांना कळलं पाहिजे. आपले गृहमंत्री फारुख अब्दुल्ला आणि इतर नेत्यांना नजरकैदेत ठेवलं नसल्याची खोटी माहिती देत आहेत”.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!