Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

‘वादग्रस्त जागा रामजन्मभूमी ही हिंदूंची श्रद्धा’

Spread the love

अयोध्येतील वादग्रस्त जागा हीच रामाची जन्मभूमी असल्याबद्दल हिंदूंची प्रगाढ श्रद्धा आणि दृढ विश्वास आहे, असे प्रतिपादन ‘रामलल्ला विराजमान’तर्फे बुधवारी करण्यात आले.

सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. एस. ए. बोबडे, धनंजय चंद्रचूड, अशोक भूषण आणि एस. अब्दुल नजीर या पाच सदस्यीय घटनापीठासमोर सध्या अयोध्या प्रकरणाची दैनंदिन सुनावणी सुरू आहे. त्यात बुधवारी रामलल्लातर्फे ज्येष्ठ विधीज्ञ सी. एस. वैद्यनाथन यांनी बाजू मांडली.

हिंदू पुराणांनुसार श्रीरामाचा जन्म अयोध्येत झाला आहे. त्यावर हिंदूंची श्रद्धा आहे. न्यायालयाने त्या पलीकडे त्याबाबत तर्क लावू नये, अशा शब्दांत वैद्यनाथन यांनी युक्तिवाद केला. इंग्रज व्यापारी विल्यम फिंच याने १६०८-१६११ या कालावधीत अयोध्येला भेट दिली होती. तेथे किल्लासदृश वास्तू असून श्रीरामाचा तिथे जन्म झाल्याची हिंदूंची श्रद्धा असल्याचे त्याने नमूद केल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले. ब्रिटनचा सर्व्हेक्षक मॉँटगोमेरी मार्टिन आणि ख्रिस्ती मिशनरी जोसेफ टायफेंथलर आदींच्या प्रवासवर्णनाचे दाखलेही वैद्यनाथन यांनी दिले.

अयोध्येतील वास्तूला बाबरी मशीद असे प्रथम केव्हा म्हटले गेले, असा सवाल घटनापीठाने केला. ‘मशिदीचा उल्लेख विसाव्या शतकात येतो. त्यापूर्वी तसा उल्लेख असल्याची कोणतीही कागदपत्रे नाहीत,’ असे वैद्यनाथन यांनी उत्तरादाखल सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!