Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : जायकवाडीच्या नाथसागर जलाशयाचे दोन दरवाजे उघडून गोदावरीत पाणी सोडले

Spread the love

मराठवाड्यातील दुष्काळी भागातील पाणीप्रश्नावर मात करण्यासाठी पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाचे दोन दरवाजे गुरुवारी उघडून गोदावरी नदीच्या पात्रात १०४८ क्युसेक पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. या पाण्यातून गोदावरी नदीवरील  बंधारे भरण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या आदेशानंतर नाथसागरातून पाणी सोडण्यात येत आहे.

राज्याच्या विविध भागांत मुसळधार हजेरी लावणाऱ्या पावसाने मराठवाड्याकडे पाठ फिरवली आहे. पावसाळा संपत आला तरी अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे मराठवाड्यातील सर्वच धरण तळाशी गेले आहे. त्यात नाशिक, नगर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जायकवाडीत पाणी आल्याने औरंगाबाद, जालना, परभणीसह काही जिल्ह्यांना दिलासा मिळाला आहे. नाशिक, नगरकडून येणाऱ्या पाण्यामुळे जायकवाडी भरत आले आहे. नाथसागरात ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाल्याने मराठवाड्यातील तहानलेल्या गावांना पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला होता. त्याची अमलबजावणी गुरूवारी करण्यात आली. गुरुवारी  प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा ९१.९९ टक्क्यांपर्यंत पोचला. त्यानंतर दुपारी नाथसागराच्या दोन दरवाजांतूम १०४८ क्युसेक पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. त्याशिवाय प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून १२०० क्युसेक, उजव्या कालव्यातून ९०० क्युसेक आणि जलविद्युत प्रकल्पासाठी १५८९ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. नाथसागरातीस एकूण जलसाठा २५३५.२६५ दशलक्ष घनमीटरपर्यंत (उपयुक्त जलसाठा १९९७.१५६ दशलक्ष घनमीटर) पोहोचला आहे. प्रकल्पात पाणी येणे थांबले आहे, अशी माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (कडा) सूत्रांनी दिली.

पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या गावांना जायकवाडीतून पाणी सोडण्याची मागणी जलसंधारण मंत्री बबनराव लोणीकर यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानंतर जलसंपदा विभागाने पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. पाणी सोडण्यासंदर्भात गोदावरी काठावरील गावांमध्ये पूर्वनियोजन करण्याची सूचना जायकवाडी पाटबंधारे विभागाने औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, परभणी येथील जिल्हाधिकाऱ्यांना १२ ऑगस्ट २०१९ रोजी दिली होती. १५ ऑगस्ट रोजी दुपारी पाटबंधारे विभागाने जायकवाडी धरणाचे दोन दरवाजे उघडले आहेत. सध्या धरणातून एक हजार ४७ क्यसेक (एक क्युसेक म्हणजे २८.३१ लिटर) वेगाने विसर्ग करण्यात येत आहे.

पैठण येथील प्रकल्पाच्या खालील बाजूला गोदावरी नदीवर १८ बंधारे आहेत. त्यापैकी नांदेड जिल्ह्यातील बंधाऱ्यांत पाणी आहे. अपेगाव, हिरडपुरी, शहागड, पाथरवाला, जोगलादेवी, मंगळूर, शहागड, राजा टाकळी, लोणीसावंगी, खडका, ढालेगाव हे बंधारे भरण्यासाठी जायकवाडीतून सोडलेल्या पाण्याचा वापर होणार आहे. या बंधाऱ्यांची साठवण क्षमता २३१.६४ दशलक्ष घनमीटर आहे. सध्या या बंधाऱ्यांत केवळ ४३.४७ दशलक्ष घनमीटर पाणी आहे. जायकवाडी प्रकल्पातून सोडलेल्या या पाण्यामुळे गोदाकाठच्या गावांतील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि खरिपाच्या पिकांचा प्रश्न मार्गी लागेल, असे मानले जाते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!