It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना वीरचक्र पदक

Spread the love

पाकिस्तानी हवाई दलाचे एफ-१६ हे लढाऊ विमान पाडणाऱ्या विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना वीरचक्र पदक जाहीर झाले आहे. स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट) अभिनंदन यांना वीरचक्र पदक प्रदान केले जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच ‘वीरचक्र’साठी त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती.

देशाचे रक्षण करताना उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सैन्य दलातील जवानांना परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीरचक्र ही पदके देऊन सन्मानित करण्यात येते. अभिनंदन यांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्याची दखल घेत त्यांच्या नावाची ‘वीरचक्र’साठी शिफारस करण्यात आली होती. बुधवारी शौर्य पदकांची घोषणा करण्यात आली. यात अभिनंदन वर्थमान यांना वीरचक्र पदक जाहीर झाले आहे. १५ ऑगस्ट अर्थात भारतीय स्वातंत्र्यदिनी त्यांना शौर्य पदक प्रदान करण्यात येणार आहे.

पुलवामात दहशतवाद्यांनी लष्काराच्या ताफ्यावर भयंकर हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारी रोजी बालाकोटमधील दहशतवादी तळावर हवाई हल्ला केला. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांनी २७ फेब्रवारी रोजी सकाळी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पाकच्या विमानांना भारतीय हवाई दलाने परतवून लावले होते. यात पाकिस्तानी हवाई दलाचे एफ-१६ हे विमान अभिनंदन यांनी अचूक मारा करीत पाडले होते. मात्र, यावेळी अभिनंदन वर्धमान यांचे लढाऊ विमान पाकिस्तानच्या हद्दीत अपघातग्रस्त झाले होते.

पाकिस्तानच्या तावडीत सापडूनही त्यांनी आपल्या कणखरपणाचे दर्शन घडवले होते. शत्रू राष्ट्राला देशासंबंधीची कोणतीही संवेदनशील माहिती कळू दिली नव्हती. त्यानंतर ते सुखरुप मायदेशात परतले होते. त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकता असल्याने अलीकडेच त्यांची श्रीनगर येथील हवाई तळावरुन पश्चिम सेक्टरमधील भारत-पाक सीमेवरील दुसऱ्या महत्वाच्या हवाई तळावर बदली करण्यात आली आहे.

Leave a Review or Comment