It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

Rajsthan : अलवर जिल्हा न्यायालयाने पहलू खान झुंडबळी प्रकरणातील सर्व सहा आरोपींची केली निर्दोष मुक्तता

Spread the love

देशभरात गाजलेल्या राजस्थानमधील पहलू खान झुंडबळी प्रकरणातील सर्व सहा आरोपींची अलवर जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. पहलू खान हत्येप्रकरणी ९ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यातील तिघे अल्पवयीन होते. १ एप्रिल २०१७ रोजी गोतस्करीच्या संशयावरून कथित गोरक्षकांनी पहलू खानला बेदम मारहाण केली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार असल्याचे पहलू खानचा मुलगा इरशादने सांगितले.

पहलू खान, त्याची दोन मुलं आणि अन्य काहीजण गायींची वाहतूक करत होते. हरयाणातील नुह जिल्ह्यात पहलू खानचे गाव असून जयपूरहून तिथे गायी पाठवल्या जात होत्या. दरम्यान, अलवर जिल्ह्यातील बेहरोर येथे कथित गोरक्षकांनी त्यांना रोखले व काठ्या तसेच लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या मारहाणीत पहलू खान गंभीररित्या जखमी झाला. १ एप्रिल २०१७ रोजी ही घटना घडली आणि ४ एप्रिल रोजी पहलू खानचा मृत्यू झाला. बेहरोर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी सात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. पहलू हत्येप्रकरणी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता तर जनावरांच्या अवैध वाहतुकीबाबत अन्य गुन्हे पोलिसांनी दाखल केले होते.

याप्रकरणी पोलिसांचा तपास ३० डिसेंबर २०१८ रोजी पूर्ण झाला पण आरोपपत्र २४ मे २०१९ रोजी दाखल करण्यात आलं. ७ ऑगस्टपासून या खटल्याची सुनावणी सुरू झाली. सुनावणीदरम्यान ४७ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पहलू खानच्या दोन मुलांच्याही साक्ष घेण्यात आल्या. या सुनावणीअंती सबळ पुराव्याअभावी न्यायमूर्ती सरिता स्वामी यांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. न्यायालयात घटनेचा व्हिडिओ सादर करण्यात आला होता. मात्र, पुरावा म्हणून व्हिडिओ पुरेसा नसल्याचे नमूद करत न्यायालयाने आरोपींना निर्दोष ठरवले. अन्य सात आरोपींविरुद्ध दुसरा खटला अप्पर जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुरू आहे तर अल्पवयीन आरोपींविरुद्ध बाल न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

Leave a Review or Comment