Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नाना पाटेकरांनी दिला पूरग्रस्तांना धीर , ५०० घरे बांधून देण्याचा संकल्प

Spread the love

तुम्ही काळजी करू नका. छप्पर आलं की सगळं काही नीट होईल. आपण सर्व मिळून पुनर्वसन करू, असं आश्वासन देत अभिनेते नाना पाटेकर यांनी पूरग्रस्तांना दिलासा दिला. शिरोळमध्ये पूरग्रस्तांसाठी ५०० घरे बांधून देणार असल्याची घोषणाही पाटेकर यांनी केली. कोल्हापूर, सातारा आणि सांगलीवर महापुराचं संकट कोसळलं. लोकांचे संसार उघड्यावर आले. घरे वाहून गेल्यानं अनेकांना छप्परही राहिलं नाही. पूरग्रस्त आता उद्ध्वस्त झालेला संसार सावरत आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीला सरकार, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, सामाजिक संस्था, मराठी, हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक जण धावून गेले आहेत. भीषण दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला धावून गेलेले संवेदनशील अभिनेते नाना पाटेकर पूरग्रस्तांच्या मदतीलाही धावले आहेत. त्यांनी आज कोल्हापुरातील शिरोळमधील पद्माराजे विद्यालयात पूरग्रस्तांची भेट घेतली. काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. छप्पर आलं की सगळं नीट होईल, असं म्हणत त्यांनी पूरग्रस्तांना दिलासा दिला. शिरोळमध्ये पूरग्रस्तांसाठी ५०० घरे बांधून देणार असल्याची घोषणा करून त्यांनी मोठा आधार दिला.

सरकारने पूरग्रस्तांसाठी काही निधी दिला आहे. बाकीचे पैसे आम्ही देत आहोत. नाम संस्था, नाना पाटेकर, मकरंद अनासपुरेंना या मदतीचे श्रेय नको. जे काही करतोय ते आपण सर्व जण एकत्र मिळून करतो आहोत. सध्या अनेक जण मदतीसाठी स्वतःहून पुढे आले आहेत. प्रत्येकाने यात वाटा उचलायचा आहे. मदतकार्य चांगल्या पद्धतीने सुरू आहे. मी सुद्धा मदतीसाठी लोकांकडे हात पसरणार आहे. अनेक जण आर्थिक मदत सुद्धा करतात. त्यांना विश्वास आहे म्हणून ते मदतीसाठी पुढे येतात. ज्या ठिकाणी कमतरता भासेल त्या ठिकाणी आम्ही नक्कीच उभे राहतो, असंही नाना म्हणाले.

शिरोळमध्ये आल्यानंतर येथील परिस्थिती कळाली. त्यामुळं ५०० घरे बांधून देण्याचा निर्णय घेतला. आता सगळ्यांना मदतीसाठी आवाहन करणार आहे. टाकळेवाडीत तीन हजार घरांच्या प्रकल्पासाठी आढावा घेणार आहे. पूरग्रस्तांना छप्पर मिळालं की सगळं नीट होईल. काळजी करू नका. नाम संस्थाच नाही तर सर्वांकडून मदत घेण्यात स्वीकारली जाईल. सरकारला सुद्धा मर्यादा आहेत. त्यामुळं आपण सगळे मिळून पूरग्रस्तांचं पुनर्वसन करायचं आहे, असं आवाहनही त्यांनी केलं. मदतीसाठी पुढे येणाऱ्या सर्वांचेच त्यांनी यावेळी आभार मानले.

दुष्काळ पडला त्यावेळी नाम संस्थेने लोकवर्गणीतून ६० कोटी रुपये दिले. सरकारनेच सर्व केले पाहिजे असं नेहमी म्हणतो. पण सरकार म्हणजे माणसंच आहेत ना! त्यामुळं आता रडायचं नाही. सगळ्यांनी मिळून या संकटाला तोंड द्यायचं, अशा शब्दांतही त्यांनी पूरग्रस्तांना धीर दिला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!