It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

Jammu & Kashmir 370 : पाकिस्तानला स्वत:वर नियंत्रण ठेवण्याचा अमेरिकेचा इशारा, कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार

Spread the love

भारताने काश्मीरबद्दल घेतलेल्या निर्णयावर पाकिस्तानने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानी लष्करानेही याबद्दल स्फोटक विधानं केली आहेत. अमेरिकेने मात्र या निर्णयावर भारताला पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानला स्वत:वर नियंत्रण ठेवण्याचाही इशारा दिला आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॉर्गन ऑर्टेगस म्हणाले, ट्रम्प प्रशासनाने काश्मीरबद्दलच्या धोरणात बदल केलेला नाही. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी सध्याच्या स्थितीत संयम बाळगावा. काश्मीर हा भारत आणि पाकिस्तानमधला द्वीपक्षीय मुद्दा आहे. या दोन्ही देशांनी आपापसात चर्चेतून काश्मीरच्या समस्येवर तोडगा काढावा, असंही ते म्हणाले.

अमेरिकेचे उपपरराष्ट्र मंत्री जॉन सॅलिवन हे भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी ते भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा करतील. त्यांच्या या दौऱ्यात काश्मीर प्रश्नाबदद्लही चर्चा होईल, असंही ऑर्टेगस यांनी सांगितलं. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान अमेरिकेला आले होते तेव्हा त्यांच्याशी काश्मीर प्रश्नाबद्दल चर्चा झाली नाही.

इम्रान खान यांनी काश्मीरमध्ये मानवाधिकारांचं उल्लंघन होत असल्याचा आरोप केला आहे. त्यावर ऑर्टेगस म्हणाले, आम्ही आताच यावर प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. काश्मीरबद्दल अमेरिकेची भूमिका स्पष्ट आहे. भारत आणि पाकिस्तानने टोकाची भूमिका घेऊ नये आणि संघर्ष टाळावा, असं आवाहन संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखांनीही केलं आहे. भारत आणि पाकिस्तानने कोणाच्याही मध्यस्थीशिवाय काश्मीर प्रश्न सोडवावा या सिमला कराराची त्यांनी आठवण करून दिली.