Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आंबेडकरी चळवळीचे महायोद्धे राजा ढाले यांचे विक्रोळीत स्मारक उभारणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

Spread the love

दलित पँथर चे संस्थापक नेते ; विचारवंत ;क्रांतिकारी साहित्यिक म्हणून राजा ढाले हे आंबेडकरी चळवळीचे महायोद्धे ठरले असून त्यांच्या प्रेरणादायी स्मृती जोपासण्यासाठी विक्रोळीत सांस्कृतिक भवन स्वरूपात राजा ढाले यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल; तसेच विक्रोळीत एखाद्या चौकास किंवा रस्त्यास ही दिवंगत राजा ढाले यांचे नाव देण्यात येईल त्या साठी राज्य शासन आणि महापालिकेकडे मी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दिले.

रिपब्लिकन पक्षातर्फे दिवंगत राजा ढाले यांच्या जाहीर अदरांजली सभेचे आयोजन मुलुंड पश्चिम येथील कालिदास नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर दिवंगत राजा ढाले यांच्या सुविद्य पत्नी दीक्षा ढाले ; सुकन्या गाथा ढाले;सभाध्यक्ष रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे; ज्येष्ठ साहित्यिक अर्जून डांगळे; संपादक बबन कांबळे; सौ शिलाताई गांगुर्डे; अनिल गांगुर्डे; आयोजक मुलुंड तालुका अध्यक्ष योगेश शिलवंत; सूत्रसंचालक अजित रणदिवे; श्रीकांत भालेराव; डी एम चव्हाण; डॉ हरीश अहिरे; मुस्ताक बाबा;राम तायडे; रवी गरुड ; नागसेन कांबळे;भारत वानखडे; बाळासाहेब गरुड; लोकशाहीर प्रभाकर पोखरीकर; मैनाताई कोकाटे; दादू झेंडे; सिद्धार्थ कासारे; सोना कांबळे; चंद्रशेखर कांबळे; हेमंत रणपिसे ; रतन अस्वारे; शशिकला जाधव; उदयराज तोरणे; सुजित पगारे;भास्कर वाघमारे; रमेश पाईकराव;विनोद जाधव; सौ अनिता अलंकार जाधव; वैशाली संगारे; अंबर केदारे; पवन बोरुडे; संदेश मोरे;श्रीधर साळवे; सुभाष किरवले आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

राजा ढाले यांच्या शी माझे आपुलकीचे संबंध होते. सुंदर हस्ताक्षर काढणे त्यांच्या अक्षराकडे बघून मी शिकलो. त्यांच्या पासून वेगळे झाल्यानंतर मी कधीही त्यांच्या विरुद्ध माझ्या मनात कोणतेही किल्मिश ठेवले नाही. मी माझे काम करीत राहिलो.असे ना रामदास आठवले म्हणाले. रमाबाई आंबेडकर नगर मधील वलंगकर बाबा वाचनालयाचे नूतनीकरण व्हावे व तेथे राजा ढाले यांच्या पुस्तकसंग्रहाची जपणूक व्हावी यासाठी आपण खासदार निधीतून 50 लाख मंजूर केले . पण तांत्रिक अडचणीमुळे ते काम मार्गी लागण्यास थोडा विलंब लागला. आता त्या कामाची अंतिम मंजुरी मिळाली असून लवकर ते वाचनालय उभारले जाईल. मात्र राजा ढाले यांच्या हयातीत या वाचनालयाचे काम पूर्ण होण्याची ईच्छा अपूर्ण राहिले असल्याची हुरहूर माझ्या मनात कायम राहील अशी खंत ना रामदास आठवले यांनी व्यक्त करून दिवंगत राजा ढाले यांना अभिवादन केले.

यावेळी दिवंगत राजा ढाले यांच्या पत्नी श्रीमती दीक्षा ढाले यांनी ढाले यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. दिवंगत राजा ढाले यांचे पूर्ण नाव राजाराम पिराजी ढाले असे होते मात्र त्यांनी राम शब्द काढून केवळ राजा ढाले असे नाव केले. ते जसे कवी ; कथा लेखक होते तसेच ते उत्तम चित्रकार होते. रामदास आठवले यांच्याशी जवळचे मैत्रीपूर्ण संबंध होते. अमच्या लग्नाला रामदास आठवले दीक्षाभूमी येथे साक्षीदार होते याची आठवण त्यांनी सांगीतले.राजा ढाले यांच्याशी लग्न झाले त्या दिवशी त्यांच्या वर 64 वॉरंट आणि 104 केसेस होत्या. सिद्धार्थ विहार हॉस्टेल ला राहत असताना ते रामदास आठवले आणि सहकाऱ्यांसाठी रविवारी घरून जेवणाचा डब्बा घेऊन जात असत. रमाबाई कॉलनीत वलंगकरबाबा वाचनालय उभारण्याची त्यांची अंतिम ईच्छा होती. त्यांनी अनेकांना त्याबाबत अर्ज दिले.मात्र कोणीही ते काम केले नाही. शेवटी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंना अर्ज दिल्यानंतर त्यांना खात्री होती की ते नक्की वाचनालयाचे काम करतील.त्याप्रमाणे रामदास आठवले यांनी खासदार निधी मंजूर करून ते काम करण्यासाठी पुढाकार घेतला. हे शेवटच्या काळात त्यांना कळले तेंव्हा ते समाधानी झाले होते अशी आठवण आयुष्यामती दीक्षा ढाले यांनी सांगितली.

यावेळी दिवंगत राजा ढाले यांची सुकन्या गाथा ढाले यांनी आपल्या वडिलांच्या राजा ढाले यांच्या आठवणी सांगितल्या. राजा ढाले हे खरे ग्रंथप्रेमी होते.एकदा पुस्तक प्रदर्शनात ते गाथा ढाले यांना घेऊन गेले आणि पुस्तक विकत घेताना त्यांनी इतकी पुस्तके चाळली विकत घेतली आणि पुस्तके घेऊन घरी गेले आणि मुलगी गाथा ढाले हिला पुस्तक विक्री प्रदर्शन स्थळी विसरून आल्याचा किस्सा सांगत गाथा ढाले यांनी राजा ढाले हे कसे पुस्तकप्रेमी होते हे सांगितले.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे यांनी राजा ढाले यांचे हस्ताक्षर अत्यंत सुंदर होते. त्यांनी मराठी साहित्य सांस्कृतिक चळवळीत बंडाचे नेतृत्व केले.दलित पँथर चे प्रमुख संस्थापक नेते होते. त्याच प्रमाणे त्यांनी साहित्यात प्रस्थापित सारस्वतांना आमच्या साहित्याचे मापदंड ठरविणारे तुम्ही कोण असा सवाल केला होता. दिवंगत राजा ढाले तरुणांमध्ये स्फुल्लिंग पेटविणारे साहित्यिक नेते विचारवंत होते.त्यांनी हिंदू संस्कृती वाचक शब्दांना पर्याय म्हणून बौद्ध सांस्कृतिक शब्द निर्माण केले. तर्कशास्त्रात ते फार मोठे विद्वान होते असे सांगत अर्जुन डांगळे यांनी कालकथीत राजा ढाले यांना आदरांजली वाहिली.

ज्येष्ठ पत्रकार  बबन कांबळे यांनी दिवंगत राजा ढाले यांच्या आठवणी सांगताना वरळी दंगलीची आठवण सांगितली. 1972 मध्ये दलित पँथर चळवळीचे आघाडी चे नेते राजा ढाले; नामदेव ढसाळ; भाई संगारे; अविनाश महातेकर; ज वि पवार हे होते. त्या पाच नेत्यांमध्ये शेवटचे प्रमुख भाषण राजा ढाले यांचे होत असे. त्या भाषणांमुळे त्याकाळातील तरुण पिढी दलित पँथर मध्ये स्वयंस्फूर्तपणे सहभागी होत होती अश्या आठवणींना ज्येष्ठ संपादक बबन कांबळे यांनी उजाळा दिला.

मुंबईत भरपूर पाऊस असूनही दिवंगत राजा ढाले यांच्या अदरांजली सभेस मुलुंड च्या कालिदास नाट्यगृह येथील मॅरेज हॉल मध्ये तुडुंब गर्दी झाली होती. त्या दिवशी फ्रेंडशिप डे असल्याने राजा ढाले आणि रामदास आठवले यांच्या मौत्रीचे किस्से आणि त्यांनी नंतरच्या 40 वर्षांत एकमेकांशी अबोला धरला आणि गेल्या वर्षी राजा ढाले यांची मुलगी गाथा ढाले यांनी रामदास आठवले आणि राजा ढाले या दोन मित्रांची पुन्हा जवळीक निर्माण करून दिली. त्याबद्दल आयोजक रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी आभार मानले.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!