Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Jammu & Kashmir : ३७० : सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांचा एकत्रित येऊन काश्मिरींसोबत लढा देण्याचा निर्धार

Spread the love

जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याचा आणि राज्याच्या विभाजनाच्या निर्णयानंतर काँग्रेसनं केंद्रातील भाजप सरकारवर कडाडून टीका केली आहे. भाजप सरकारने देशाचे शिर कापले असून, देशाशी गद्दारी केली आहे, असं काँग्रेसनं म्हटलं आहे. ‘चीन आणि पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या या संवेदनशील राज्याचा सरकारने अक्षरश: खेळ मांडला आहे. आमच्या पक्षासह अन्य पक्षही या गोष्टीचा कडाडून विरोध करतील,’ असा निर्धार राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी व्यक्त केला.

जम्मू-काश्मीरसारख्या सीमावर्ती राज्यात तेथील जनतेच्या पाठिंब्याशिवाय फक्त सैन्याच्या बळावर शत्रूशी लढता येऊ शकत नाही. १९२७ नंतर अशा प्रकारचं अघटित घडलं आहे. जम्मू-काश्मीरसाठी लाखो लोकांनी बलिदान दिलं आहे. तेथील जनता, सुरक्षा दलांचे जवान आणि मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांनी वेळोवेळी दहशतवादाचा सामना केला आहे, असेही आझाद म्हणाले. ‘कलम ३७० मुळे काश्मीर एका धाग्यात बांधलं गेलं होतं. पण भाजप सरकारने सत्तेच्या धुंदीत आणि मते मिळवण्यासाठी राज्यातील तीन-चार बाबी एका झटक्यात रद्द केल्या. भारताच्या इतिहासात हे काळ्या अक्षरांनी लिहिलं जाईल. सरकारनं कलम ३७० रद्द केलं, तसंच राज्याचं विभाजनही केलं. आता काश्मीरमध्ये नायब राज्यपाल असतील. एनडीए सरकार या थरापर्यंत जाईल आणि जम्मू-काश्मीरचं अस्तित्वच संपवून टाकेल असा विचार स्वप्नात सुद्धा केला नव्हता,’ असंही ते म्हणाले.

सर्व धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्रित येऊन लढा देतील. जम्मू-काश्मीरच्या लोकांच्या पाठिशी ते नेहमीच उभे राहतील. यापूर्वी विरोधी पक्षाच्या नेत्यांची भाषणे राज्यसभा आणि लोकसभा या वाहिन्यांवर दाखवली जायची. पण आज सकाळी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, माकप, सीपीआय, डीएमके, समाजवादी पक्षासह अन्य पक्षांच्या नेत्यांनी धरणे धरले होते. पण ते वाहिन्यांवर दाखवले गेले नाही, असा आरोपही आझाद यांनी केला.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनीही भाजप सरकारवर टीकास्त्र सोडलं. सरकारने जे काही केलं त्यात जोखीम आहे. या सरकारने राज्यघटनेतील कलमांची चुकीची व्याख्या केली आहे. भारताची विचारधारा धोक्यात आहे असं मी सर्व राजकीय पक्ष, राज्ये आणि देशातील जनतेला सांगू इच्छितो. हा भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात वाईट दिवस आहे, असं ते म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!