Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

काश्मीरमध्ये कलम १४४ लागू, सर्व प्रमुख नेते नजर कैदेत

Spread the love

जम्मू आणि काश्मीरमधील अमरनाथचे यात्रेकरू आणि इतर पर्यटकांना परत पाठवल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. आज मध्यरात्रीपासून श्रीनगर आणि राज्यातील इतर काही जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू झालं असून प्रमुख राजकीय नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आलं आहे. तसंच, राज्यातील इंटरनेट व लँडलाइन फोन सेवाही बंद करण्यात आली आहे. काश्मीरमधील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये आणि इतर संस्थांना सोमवारपासून सुट्टी देण्यात आली आहे.

श्रीनगरमधील सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. श्रीनगर शहर व जिल्ह्यामध्ये जमावबंदीही लागू करण्यात आली आहे. श्रीनगरप्रमाणे काश्मीर खोऱ्यातील इतर काही जिल्ह्यांमध्येही १४४ कलम लागू करण्यात आलं असल्याची माहिती मिळते आहे. तसंच, जम्मूमध्येही सोमवारपासून सरकारी आणि खासगी शिक्षण संस्था बंद राहणार आहेत. असं असलं तरी संचारबंदी मात्र लागू करण्यात आली नसल्याचा खुलासा जम्मू-काश्मीर सरकारने केला आहे.

काश्मीरमध्ये होणाऱ्या घडामोडींबद्दल चर्चा करण्यासाठी नॅशनल कॉन्फरन्सचे वरिष्ठ नेते फारुक अब्दुल्ला यांनी सर्व प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांची रविवारी संध्याकाळी बैठक बोलावली होती. या बैठकीला मेहबुबा मुफ्ती आणि शाह फैजल हे दोघंही उपस्थित होते. या बैठकीनंतर काही वेळातच जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि फारुक अब्दुल्लांचे चिरंजीव ओमर अब्दुल्ला यांनी आपल्याला स्थानबद्ध केल्याचा दावा केला. तसंच, मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू होणार असल्याची भीतीही त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली होती.

काश्मीरमध्ये होणाऱ्या घडामोडींबद्दल देशभरात संभ्रमाचे वातवरण आहे. कलम ‘३५ अ’ बद्दल महत्त्वपूर्ण निर्णय या आठवड्यात घेतला जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. अशा परिस्थितीत काहीही झालं तरी ‘धैर्यशील राहा, परमेश्वर आपल्या सर्वांचं रक्षण करेल’, असं आवाहन मेहबुबा मुफ्ती आणि फारुक अब्दुल्लांनी नागरिकांना केलं आहे. तेव्हा येत्या आठवड्यात काश्मीरमध्ये काय राजकीय स्थित्यंतरं होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मेहबुबा मुफ्ती यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून त्यांना स्थानबद्ध करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!