Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

तीन नेत्यांनी प्रवेश केला म्हणजे मेगाभरती नाही, अजून कोणी जाणार असेल तर शुभेच्छा : शरद पवार

Spread the love

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांना बुधवारी भाजपात प्रवेश देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते मधुकर पिचड, वैभव पिचड, चित्रा वाघ, शिवेंद्रराजे, संदीप नाईक या सगळ्यांचा भाजपा प्रवेश झाला. तसेच काँग्रेसचे नेते कालिदास कोळंबकर यांचाही भाजपात प्रवेश झाला. दरम्यान यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोला लगावत तीन नेत्यांनी प्रवेश केला म्हणजे मेगाभरती नाही असं म्हटलं आहे. ते साताऱ्यात पत्रकारांशी बोलत होते.

“शरद पवार हृदयात आहेत बोलणाऱ्यांचं हृदय तपासा”, असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. तसंच अजून कोणी जाणार असेल तर त्यांनाही शुभेच्छा असंही यावेळी त्यांनी म्हटलं. “साताऱ्यासाठी माझ्याकडे तीन अर्ज आहेत. साताऱ्याची जागा राष्ट्रवादी राखेल याची काही चिंता नाही”, असा विश्वास यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केला.

विरोधी आमदारांना धमकावलं जात आहे. त्यांच्या मतदारसंघातील कामे अडवून व दबाव टाकून, आमिषे दाखवून पक्ष प्रवेशाचा दबाव आणला जात असल्याचा आरोप यावेळी शरद पवार यांनी केला. “सत्ता नसतानाही कामे होऊ शकतात. पण सत्ताधाऱ्यांना तोंड देऊ शकत नाहीत म्हणून काहीजण गेले. तरीपण या वेळेस साताऱ्याची जागा आम्हीच राखू. या जागेसाठी राष्ट्रवादीतून तीन अर्ज माझ्याकडे आले आहेत.येथून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येणार’, असं शरद पवारांनी सांगितलं. “उमेदवार कोण देता येईल याबाबत चर्चा सुरू असून राजघराण्यातील उमेदवार देता येईल का ? याबाबत अद्याप उदयनराजे भोसले यांच्याशी चर्चा झालेली नाही. उद्या ते मला भेटण्यासाठी येणार आहेत. त्यावेळी आम्ही निश्चित काय ते ठरवू”, अशी माहिती यावेळी शरद पवारांनी दिली.

शरद पवार यांनी शिवेंद्रराजे यांच्या भाजपा प्रवेशावरही भाष्य केलं. त्यांनी सांगितलं की, “शिवेंद्रराजे मला भेटले तेव्हा पक्ष सोडणार नाही असं सांगितलं होतं. शिवेंद्रराजे यांनी मला जे सांगितलं तेच मी तुम्हाला सांगितलं. आता ते सत्य सोडून काही सांगतात हे मला माहिती नव्हतं”. यावेळी शरद पवार यांनी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यात संघर्ष झाल्याचं वृत्त फेटाळलं. सत्तेत नसल्याने आमची कामं होत नाहीत असं त्यांनी सांगितलं असल्याचं त्यांनी म्हटलं.

शिवेंद्रसिंहराजे भाजपामध्ये गेल्यामुळे जिल्हापरिषद आणि जिल्हा बँकेच्या राजकारणावर काही फरक पडेल का ? या प्रश्नावर त्यांनी याबाबत मला येथील नेमकी परिस्थिती माहित नाही अंस सांगत शेजारी बसलेल्या आमदाराकडे बोट करून काही फरक पडेल काय असे विचारले त्यावर सर्वांनी काहीही फरक पडणार नाही असे सांगितले. सातारा जावळीचे आमदार व सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे व पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केल्यानंतर रात्रीच पवार सातार्‍यात आले. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नेटवर्क व कार्यकर्त्यांची फळी मजबूत आहे त्यामुळे ते काळजी घेत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!