Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

EVM विरुद्ध लढ्याची हाक; २१ ऑगस्टला विरोधकांचा एल्गार , मोर्चा काढण्याआधी ईव्हीएमविरोधात जनतेकडून फार्म भरून घेणार

Spread the love

मागील लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या प्रचंड विजयानंतर ईव्हीएमवर संशय व्यक्त करणाऱ्या विरोधी पक्षांनी आता या मुद्द्यावर व्यापक लढ्याची तयारी सुरू केली आहे. मुंबईत आज झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ईव्हीएमविरोधात मोर्चाची घोषणा करण्यात आली. २१ ऑगस्टला मुंबईत हा मोर्चा निघणार आहे. ‘हा मोर्चा कुठल्याही पक्षाच्या झेंड्याखाली नसेल, तर तो सर्वसामान्यांचा मोर्चा असेल,’ असंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं.

वांद्रे येथील एमआयजी क्बलमध्ये ही पत्रकार परिषद झाली. ईव्हीएमच्या मुद्द्यावर विरोधकांना एकत्र आणणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, शेकापचे जयंत पाटील, ‘लोकभारती’चे कपिल पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, भाकपचे प्रकाश रेड्डी आदी नेते यावेळी उपस्थित होते.

‘ईव्हीएम-व्हीव्हीपॅट हटवा, लोकशाही वाचवा’ या बॅनरखाली ही पत्रकार परिषद घेण्यात आली. राज ठाकरे यांनी सुरुवातीलाच विरोधकांची भूमिका मांडून पुढील आंदोलनाची माहिती दिली. २१ ऑगस्टला निघणाऱ्या मोर्चाच्या आधी जनतेकडून एक विशिष्ट फॉर्म भरून घेतला जाणार आहे. ईव्हीएममधील त्रुटींबाबत जनजागृती केली जाणार आहे. त्याद्वारे लोकांचंही मत विचारात घेतलं जाणार आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली.

‘मागील लोकसभा निवडणूक ही पहिलीच अशी निवडणूक होती, जिच्या निकालामुळं हरणाऱ्याबरोबर जिंकणाऱ्यांनाही धक्का बसला. ही गडबड बघता शिवसेना, भाजपनंही आमच्या आंदोलनात सहभागी व्हायला हवं,’ असं राज म्हणाले. ‘प्रत्येक सभेत पुढच्या वेळी किती जागा जिंकणार याचे आकडे भाजपवाले सांगताहेत. कशाच्या बळावर ते सांगताहेत,’ असा सवाल राज यांनी केला.

विरोधकांच्या ईव्हीएमविरोधी आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्ध्यात बोलताना टोला हाणला होता. विरोधकांनी जनतेत जाऊन काय चुकलं, हे समजून घ्यायला हवं, असं ते म्हणाले होते. त्याबाबत विचारले असता, ‘बसवलेल्या माणसानं जास्त बोलू नये,’ असं राज यांनी सुनावलं. ‘जनता निवडून देईल हा विश्वास मुख्यमंत्र्यांन असेल तर ईव्हीएम मशिनला ते का कवटाळून बसले आहेत, अशी विचारणाही राज यांनी केली.

राज ठाकरे हे देखीस ईडीच्या रडारवर असल्याची चर्चा आहे. याबद्दल राज ठाकरे यांना विचारले असता, ‘ईडीच्या चौकशीच्या बातम्या मी देखील वृत्तपत्रांत वाचल्या आहेत. मला अद्याप कुठलीही नोटीस आलेली नाही आणि मी अशा चौकशीला घाबरतही नाही,’ असं ते म्हणाले. ‘ईडीच्या चौकशीचा दबाव वृत्तपत्र, वृत्तवाहिन्यांच्या मालकांवरही आहे. पत्रकारांनाही त्यांच्या भूमिका मांडता येत नाहीएत, असा आरोप राज यांनी केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!