Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

विधानसभा २०१९ : मुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेला सुरुवात, जे चांगले आहेत त्यांना प्रवेश , बाकीच्यांना हाऊसफुल्ल : फडणवीस

Spread the love

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला सुरुवात झाली आहे. अमरावतीमधील गुरुकुंज मोझरी येथून जनयात्रेला सुरुवात केली असून यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. गेल्या सरकारने १५ वर्षात केलं नाही त्याच्यापेक्षा दुप्पट आम्ही करुन दाखवलं असा दावा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. पुन्हा भाजपाचं सरकार येणार असल्याचा आत्मविश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंहदेखील यावेळी उपस्थित होते.

“जनता हीच आमची राजा आहे. जनता आमचं दैवत आहे. आम्ही मालक नाही, सेवक आहोत”, असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. “तसंच आपण केलेली कामं हे जनतेकडे जाऊन सांगायचं आहे. महाराष्ट्राच्या जनतेचा आशिर्वाद घेण्यासाठी चाललो आहे. आपण केलेल्या कामांची माहिती देणार आहोत आणि पुन्हा एकदा जनादेश घेऊन येणार आहोत”, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षात सर्व समस्या आम्ही संपवल्या असा दावा करणार नाही, पण गेल्या सरकारने १५ वर्षात केलं नाही त्याच्यापेक्षा दुप्पट आम्ही करुन दाखवलं असं सांगत विरोधकांवर टीका केली. तसंच कोणत्याही व्यासपीठावर येऊन चर्चा करायला आपण तयार आहोत असं खुलं आव्हान विरोधकांना दिलं. जर आपला पराभव झाला तर जनादेश घेण्यासाठी बाहेर पडणार नाही असंही त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्राचा शिक्षणातला क्रमांक १८ वा होता, फक्त तीन वर्षात देशावर तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचं काम आमच्या सरकारने केलं. येत्या काळात पहिल्या क्रमांकावर येईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

“औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. देशात सर्वात जास्त रोजगार निर्मिती महाराष्ट्रात झाली. देशात जेवढी रोजगार निर्मिती झाली त्यातील २५ टक्के राज्यात झाली”, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. “याआधीच्या सरकारमधील नेते जेव्हा दिल्लीला जायचे तेव्हा हात हलवत परत यायचे. पण मी जेव्हा कधी दिल्लील गेलो तेव्हा मोदींनी मला भरभरुन दिलं. मोदींनी महाराष्ट्राला काही कमी पडू दिलं नाही”, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी मोदींचे आभार मानले.

भाजपात सुरु असलेल्या पक्ष प्रवेशावर बोलताना आता भाजपा कोणाच्याही मागे फिरत नाही. वेगवेगळे नेते, पुढारी आमच्या मागे फिरतात आणि प्रवेश द्या अशी विनंती करतात. जे चांगले आहेत त्यांना प्रवेश देतो बाकीच्यांना हाऊसफुल्ल आहे सांगतो असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. “दुष्काळाशी हात करण्यासाठी पुढची पाच वर्ष घालवायची आहेत असं सांगताना पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही”, असा निर्धार त्यांना यावेळी व्यक्त केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!