Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राज ठाकरेंनी घेतलं मनावर !! ईव्हीएम विरोधी मोहिमेत सहभागी होण्याचं ममतांना भेटून केलं आवाहन …

Spread the love

ईव्हीएम विरोधी मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे विविध पक्षनेत्यांची भेट घेत असून राज यांनी आज कोलकाता येथे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांची मुख्यमंत्री कार्यालयात भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये ईव्हीएम व अन्य मुद्द्यांवर विस्ताराने चर्चा झाली.

राज व ममता यांच्यात सुमारे पाऊणतास चर्चा झाली. या चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधत ईव्हीएमबाबतचा आपला आक्षेप पुन्हा एकदा नोंदवला. ईव्हीएमला आमचा आधीपासूनच विरोध आहे. त्यासाठी आम्ही कोर्टातही धाव घेतली होती, असे नमूद करत जपान, ब्रिटनमध्येही ईव्हीएम नाही याकडे ममता यांनी लक्ष वेधले. राज यांनीही ईव्हीएमवर आक्षेप घेत निवडणूक आयोग, कोर्ट या सगळ्यांवरचा आपला विश्वास उडाला असल्याचे सांगितले.

दरम्यान, ईव्हीएमच्या मुद्द्यावरून राज यांनी ८ जुलै रोजी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती. या भेटीत ईव्हीएममधील त्रुटींवर बोट ठेवत महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका मतपत्रिकेद्वारे घ्याव्यात, अशी मागणी राज यांनी केली होती. निवडणूक आयुक्तांच्या भेटीनंतर राज यांनी यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेतली होती व त्यांच्याशी ईव्हीएमसह विविध विषयांवर चर्चा केली होती. त्यानंतर आता राज यांनी ममता यांची भेट घेऊन ईव्हीएमविरोधी आवाज अधिक बुलंद करण्याचा निर्धार केला आहे.

ईव्हीएमबाबत चर्चा करण्यासाठी मी ममतांची भेट घेतली. ममतांसोबत झालेल्या चर्चेत तृणमूल काँग्रेस पक्ष लोकशाहीच्या रक्षणासाठी कटिबद्ध असल्याचं दीदींनी मला सांगितलं. ईव्हीम विरोधात मुंबईत मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चासाठी दीदींनी मुंबईत यावं, असा आग्रह धरला. त्यावर ममतांनी मी तुमच्यासोबत असल्याचे सांगितले, असे राज म्हणाले. ईव्हीएम विरोधात आपण कोर्टात जाणार का, अशी विचारणा केली असता हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाकडून मला आता काहीच अपेक्षा उरलेली नाही, असे राज म्हणाले.

लोकशाही वाचवण्यासठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. निवडणुकीआधीच एखादा पक्ष आम्हाला एवढ्या एवढ्या जागा मिळणार आहेत, असं सांगत असेल तर ही गंभीर बाब आहे, असे नमूद करत ममतांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला. मुंबईत २१ ऑगस्टला होणाऱ्या मोर्चासाठी राज यांनी मला बोलावलं आहे. मात्र त्यादिवशी मला दुसरा कार्यक्रम असल्याने मी जाऊ शकणार नाही. मी नंतर निश्चितच मुंबईत जाईन, असे ममता म्हणाल्या.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!