Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राज्य सभा २०१९ : वाहन चालवताय ? मग आता हे नवे नियम लक्षात घ्या ….

Spread the love

राज्यसभेत आज बहुचर्चित मोटर वाहन दुरुस्ती विधेयक – २०१९ प्रदीर्घ चर्चेनंतर १३ विरूद्ध १०८ अशा फरकाने मंजूर झाले. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज राज्यसभेत हे विधेयक मांडले. या विधेयकातून रस्ते अपघात रोखण्यावर भर देण्यात आला आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यास दहापट दंड आकारण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. हे विधेयक सादर करताना केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी हे मान्य केली की, देशात मागिल पाच वर्षात रस्ते अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच, यामध्ये होणाऱ्या मृत्यूच्या घटनांमुळे रस्ते सुरक्षाच्या सध्याच्या कायद्यात बदल करण्याची आवश्यकता आहे. राज्यसभेत विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना गडकरींनी हे स्पष्ट केले की, सरकारचा मोटर वाहन दुरुस्ती विधेयकाद्वारे राज्यांच्या अधिकारात हस्तक्षेप करण्याचा कोणताही विचार नाही.

असे असेल नव्या दंडाचे स्वरूप…

दरम्यान या विधेयकानुसार आता हेल्मेट न वापरणाऱ्यास १०० रूपयां ऐवजी एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. शिवाय वाहनचालकाचं लायसन्स तीन महिन्यांसाठी जप्त करण्यात येणार आहे.

दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यास दोन हजारांऐवजी आता दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. तर हिट अँड रन केसमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तिच्या कुटुंबीयांना दोन लाखांची भरपाई देण्यात येणार आहे.

गाडी चालवताना मोबाईलवर बोलल्यास व परवान्याशिवाय गाडी चालवणाऱ्यास ५ हजाराचा दंड आकारण्यात येणार आहे.

परवाना नसताना गाडी चालवण्याचेही अनेक प्रकार उघडकीस आल्याने परवान्याशिवाय गाडी चालवणाऱ्यांनाही या विधेयकात चाप लावण्यात आला आहे. आतापर्यंत परवान्याशिवाय गाडी चालवणाऱ्यास कलम १८१ अन्वये ५०० रुपये दंड आकारण्यात येत होता. आता दंडाची रक्कम ५ हजार करण्यात आली आहे.

वाहन चालवण्याची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला घर बसल्याचं ऑनलाइन वाहन शिकत असल्याचा परवाना मिळणार आहे.

सीट बेल्ट न लावल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. आधी ही रक्कम शंभर रुपये होती.

बसमधून विना तिकिट प्रवास केल्यास दोनशे रुपयांऐवजी ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

अल्पवयीन मुलांनी गाडी चालवल्यास गाडीच्या मालकाला दोषी मानलं जाणार आहे. याप्रकरणी वाहनाच्या मालकाला २५ हजार रुपये दंड आणि ३ वर्षाची शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.

रुग्णवाहिकांना जाण्यासाठी प्राधान्य देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. रुग्णवाहिकेचा रस्ता अडवल्यास दहा हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

वाहनचालकांना मोबाईलद्वारेच टोल भरता येणार आहे. त्यामुळे आता कुणालाही टोल नाक्यावर टोल भरण्यासाठी थांबण्याची गरज पडणार नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!