It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

World : जगातील सर्वश्रेष्ठ सीईओंच्या यादीत लक्ष्मी मित्तल तिसरे तर भारतात पहिले, मुकेश अंबानी ४९ व्या क्रमांकावर

Spread the love

‘सीईओ वर्ल्ड मॅगेझिन’ने जारी केलेल्या जगातील सर्वश्रेष्ठ सीईओंच्या यादीत आर्सेलर मित्तलचे चेअरमन लक्ष्मी मित्तल यांनी तिसरं आणि भारतातील सीईओंच्या यादीत पहिलं स्थान पटकावलं आहे. या यादीत भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन(आयओसी)चे चेअरमन संजीव सिंह आणि ओएनजीसीचे प्रमुख शशी शंकर यांच्यासह भारतातील एकूण दहा सीईओंचा समावेश करण्यात आला आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सीईओंची ही यादी ट्विटरवर रिट्विट केली आहे.

या यादीत जगातील एकूण १२१ सीईओंचा समावेश करण्यात आला आहे. त्यात वॉलमार्टचे सीईओ डग्लस मॅकमिलन यांनी अव्वल स्थान पटकावलं आहे. तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी ४९ व्या, आयओसीचे चेअरमन संजीव सिंह हे ६९ व्या तर ओएनजीसीचे चेअरमन शशी शंकर हे ७७ व्या स्थानावर आहेत. सीईओ वर्ल्डने देशनिहाय सीईओंचीही यादी जारी केली आहे. त्यात भारतातील सीईओंच्या यादीत लक्ष्मी निवास मित्तल यांनी पहिलं स्थान पटकावलं आहे.

याशिवाय जगभरातील सीईओंच्या यादीत एसबीआयचे चेअरमन रजनीश कुमार (८३ व्या), टाटा मोटर्सचे सीईओ गुंटर बटशेक (८९व्या) , बीपीसीएलचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक डी. राजकुमार (९४व्या), राजेश एक्सपोर्ट्सचे कार्यकारी अध्यक्ष राजेश मेहता(९९व्या), टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे सीईओ राजेश गोपीनाथन आणि विप्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी आबिदअली झेड. नीमचवाला (११८ व्या) या भारतीयांचाही समावेश करण्यात आला आहे.

जागतिक सीईओंच्या या यादीत रॉयल डच शेलचे सीईओ बेन वॅन ब्यूंडर यांनी दुसरा तर लक्ष्मी मित्तल यांनी तिसरा क्रमांक पटकावला आहे. सौदी अरामकोचे सीईओ अमीन एच नासिर यांना चौथ्या, बॉब डुडले यांना पाचव्या, अॅक्सॉनमोबिलचे सीईओ डेरन वुड्स यांना सहाव्या, फॉक्सवॅगनचे सीईओ हरबर्ट डीएस यांना सातव्या, टोयोटाचे सीईओ अकिओ टोयोदा यांना आठव्या, अॅपलचे सीईओ टीम कुक नवव्या आणि बर्कशायर हॅथवेचे सीईओ वॉरेन बफे यांना दहाव्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे.