Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आपण समान आहोत हे मान्य केल्यास राजकीय क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही, गोर बंजारा सत्ता संपादन मेळाव्यात प्रकाश आंबेडकर

Spread the love

निवडणुकीमध्ये दलित, बौद्ध, मुस्लीम समुहाच्या बरोबर इतर समुहाचेही मतदान मिळविता आले पाहिजे, मतदान घेता आले पाहिजे तसेच देताही आले पाहिजे तरच सामाजिक भूमिका समान राहू शकते. आपण समान आहोत हे एकमेकांनी मान्य केल्यास राजकीय क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन वचिंत बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

गारखेडा परिसरातील राधाकृष्ण मंगल कार्यालयात गोर बंजारा समन्वय समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गोर बंजारा सत्ता संपादन मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खासदार इम्तियाज जलील, मेळाव्याचे आयोजक राजपालसिंह राठोड, प्रा. पी. टी. चव्हाण, वंचितचे अमित भूईगळ, मोहन राठोड, चुन्नीलाल जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, इतिहासात जे घडले ते घडले, मात्र आता लोकशाहीमध्ये होत असलेल्या निवडणुकीत कनिष्ठ आणि वरिष्ठ असे भेद करून मने कलुषीत करण्याचा प्रयत्न करुन सत्ता मिळविण्यात येत आहे. धर्माचा वापर हा समाज सुधारण्यासाठी नव्हे तर समाजमध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

गोरबंजारा समन्वयक समितीचे अध्यक्ष राजपाल सिंह राठोड यांनी यावेळी मेळाव्यामागची भूमिका विषद करताना सांगितले की,  गेली अनेक वर्ष विविध पक्षांसोबत राहून देखील बंजारा समाजाच्या पदरात काहीच पडले नाही,  हा समाज कायमच उपेक्षित राहिला. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही बंजारा समाज आजही मूलभूत गरजांपासून वंचित आहे बंजारा समाजाचा एसटी सूचीत समावेश करण्यात यावा, समाजाची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी आदी विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक नेते  प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोर बंजारा समाजाला न्याय मिळण्यासाठी संपूर्ण समाज वंचित बहुजन आघाडी सोबत राहील. तर प्रा . पी टी . चव्हाण यांनी बंजारा समाजाला ४० जागा द्याव्यात अशी मागणी केली. तसेच कुठल्याही बंजारा समाजाच्या उमेदवाराला तिकीट देताना गोरबंजारा समन्वय समितीला विश्वासात घ्यावे असे आवाहनही यावेळी बोलताना केले. अंबारसिंग चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. याच मेळाव्यात ” प्रतिभावंत ” या प्राचार्य ग. ह. राठोड यांच्या जीवनावरील गौरव अंकाचे प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याच कार्यक्रमात नगरसेवक कृष्णा बनकर यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.

या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष राजपाल सिंह राठोड, आत्माराम जाधव, नंदू भाऊ पवार, कांतीलाल नाईक, प्रा. पी टी चव्हाण, प्रल्हाद दादा राठोड, डॉ. कृष्णा राठोड, जय कुमार राठोड, चुन्नीलाल जाधव, संजय चव्हाण, हिरासिंग राठोड, जितेश राठोड, मनोहर चव्हाण, ज्ञान सिंग जाधव आदींचा सहभाग होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!