Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मुंबई काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी एकनाथ गायकवाड यांची नियुक्ती

Spread the love

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा प्रश्न अद्याप निकाली आलेला नसतानाच अखिल भारतीय काँग्रेस समितीकडून मुंबई कार्याध्यक्षपदी माजी खासदार एकनाथ गायकवाड यांची नियुक्ती शुक्रवारी जाहीर केली. गायकवाड यांच्या नियुक्तीतून मुंबईत दलित चेहरा देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे मत राजकीय विश्लेषकांकडून वर्तविण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी मिलिंद देवरा यांनी मुंबईसाठी तीन कार्याध्यक्ष नेमण्याची मागणी केली होती. त्या धर्तीवर काँग्रेस हायकांमडने हा निर्णय घेतला आहे.

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्कारल्यानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरु झाले होते. त्यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी देखील आपला पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सुपूर्द केला होता. हा राजीनामा अद्याप हायकमांडने स्वीकारला नसला तरी याबाबत अंतिम निर्णय अद्याप जाहीर केलेला नाही. हा राजीनामा देताना देवरा यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईत तीन कार्याध्यक्षांची नेमणूक करण्याची मागणी केली होती. वर्षा गायकवाड, अमिन पटेल आणि भाई जगताप या तिघांना मुंबईसाठी कार्याध्यक्ष नेमावं, अशी मागणी मिलिंद देवरा यांनी केली होती. परंतु, काँग्रेसने ज्येष्ठत्वाच्या निकषांवर ही जबाबदारी एकनाथ गायकवाड यांच्याकडे सोपवली आहे.

गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात शिवसेनेने झेंडा फडकवला. शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. या निवडणुकीत राहुल शेवाळे यांना ४२४९१३ मते पडली. तर काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांना २७२७७४ मते पडली. २००९ साली दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे एकनाथ गायकवाड निवडून आले होते. दरम्यान, मिलिंद देवरा यांनी गायकवाड यांच्या निवडीनंतर त्यांचे अभिनंदन केले असून मुंबई काँग्रेस त्यांच्या सोबत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!