Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Mumbai Crime : अल्पवयीन पीडितेवर बलात्कारातून बाळाला जन्म देण्याचा दुःखद प्रसंग, सामाजिक कार्यकर्त्याने आधार दिल्याने उघडकीस आला गुन्हा

Spread the love

मुंबईत बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलीवर दोघांनी बलात्कार केला होता. जवळपास एक वर्ष या मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. बुधवारी पीडित मुलीची प्रसूती झाली असून तिने एका मुलीला जन्म दिला. एका सामाजिक कार्यकर्त्याला ही मुलगी कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ भेटली होती. यानंतर तीन दिवसांपुर्वी तिला नागपाडा पोलीस ठाण्यात आणण्यात आलं होतं. मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं निष्पन्न झालं. सिगारेटचे चटके दिल्याने मुलीच्या अंगावर जखमा होत्या.

पोलिसांनी छळ आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या आईच्या निधन झाल्यानंतर तिच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं होतं. वडिलांचं निधन झाल्यानंतर सावत्र आईने तिला आपल्या मुलासोबत पश्चिम बंगालमधून मुंबईला आणलं. एका दलालाच्या मदतीने तिने कामाठीपुरात घर घेतलं. यावेळी पीडित मुलगी १० वर्षांची होती.

काही वर्षांनी दलालाने मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली. मुलीने आईकडे तक्रार केली मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. जेव्हा मुलगी गरोदर दिसू लागली तेव्हा तिला घराबाहेर काढण्यात आलं. “घराबाहेर काढल्यानंतर मुलगी शहरात फिरु लागली. कुर्ला स्थानकावर पाहिल्यानंतर एका सामाजिक कार्यकर्त्याला संशय आला आणि त्याने पोलिसांना कळवलं. सामाजिक कार्यकर्ता आणि पोलिसांनी मुलीला नागपाड्याला नेलं. तिथे मुलीने सगळा घटनाक्रम सांगितला”, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.

मुलीने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी दलाला आणि मुलगी राहत होती त्या घराच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला. घरमालकानेही आपल्यावर बलात्कार केल्याचं मुलीने पोलिसांना सांगितलं.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बागवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे. आरोपींची संख्या अजून वाढू शकते. आम्ही पुरावे गोळा करत आहोत. पीडित मुलीने एका बाळाला जन्म दिला असून सध्या ती रुग्णालयात आहे”. दरम्यान पोलीस मुलीच्या सावत्र भावाची काय भूमिका होती याचाही तपास करत आहेत. बाळ नेमकं कोणाचं आहे याची माहिती मिळवण्यासाठी वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!