Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सुसाईड नोट मध्ये काय लिहिले पायलने ? आता मला फक्त शेवट दिसतोय !

Spread the love

डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात तिन्ही डॉक्टरांनी दाखल केलेल्या जामिनाच्या याचिकेवरील सुनावणी ३० जुलैपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. तसेच न्यायालयाने या जामीन याचिकेच्या सुनावणीचे व्हिडीओ रेकॉर्डिंगही करण्याचे आदेश दिले आहेत. गुरूवारी झालेल्या सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती डी.एस.नायडू यांनी या सुनावणीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्याचे आदेश दिले.

तक्रारदारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी अॅट्रॉसिटी कायद्यातील तरतुदींनुसार खटल्याच्या सुनावणीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग होणे आवश्यक असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर न्यायमूर्ती नायडू यांनी या खटल्याच्या सुनावणीसाठी व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्याचे आदेश दिले.

काही दिवसांपूर्वीच डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या तीन डॉक्टरांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर हेमा अहुजा, अंकिता खंडेलवाल, भक्ती मेहेर यांच्याविरोधात मुंबई गुन्हे शाखेने २ हजार पानी आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी २५ जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली होती.

नायर हॉस्पिटलमध्ये २२ मे रोजी डॉ. पायल तडवी हिने तिच्या रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे मुंबईच्या वैद्यकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ माजली.  या दरम्यान पायल तडवीने लिहिलेली सुसाईड नोट गुरुवारी पत्रकारांच्या हाती लागली. पायलने लिहलेली तीन पानांची सुसाईड नोट लिहण्यासाठी रुग्णालयातील केस पेपरचाच वापर केलेला आहे. पायलने ही सुसाईड नोट इंग्रजीमधून लिहलेली असून त्यात पायलने तिचा आणि तिची सहकारी स्नेहल या दोघीचा कसा छळ मांडला होता याचा उल्लेख केलेला आहे. यामध्ये अटकेत असलेल्या तिघीचा उल्लेख करून या तिघी आत्महत्येस जवाबदार असल्याचे पायलने सुसाईड नोट मध्ये म्हटले आहे. पायल ज्या विभागात काम करीत होती, तेथील वरिष्ठांनी देखील याची गंभीरतेने दखल घेतली नसल्याचे म्हटले आहे.

वास्तविक सुरुवातीला ही सुसाईड नोट पोलिसांना मिळालीच नाही. पायलला गळफास काढून जेव्हा उपचारांसाठी नेण्यात आलं, तेव्हा या तिघींपैकी दोघी तिच्या रुममध्ये आणि बाहेर घुटमळत असल्याचं सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसून आलं होतं. मात्र, अखेर पोलिसांना पायलच्या मोबाईलमध्ये तिच्या हस्ताक्षरामध्ये लिहिलेली सुसाईड नोट सापडली. या नोटचे फोटो पायलनं मोबाईलमध्ये काढून ठेवले होते. त्यामुळे आरोपी महिला डॉक्टरांनीच पायलने लिहिलेली सुसाईड नोट नष्ट केली असण्याच्या दाव्याला बळ मिळालं आहे. या सुसाईड नोटमध्ये पायलनं तिघा महिला डॉक्टरांच्या त्रासाबद्दल सर्वकाही लिहिलं आहे. ‘या तिघींनी विभागातील ए. एच. ओ. विभागप्रमुख आणि प्राचार्य यांच्यासमोर आमची चुकीची प्रतिमा तयार केली होती. अनेक वेळा मॅडमकडे पुढे येऊन तक्रार करूनही त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे मला यातून कुठलाही मार्ग दिसत नाही, दिसतोय तो फक्त शेवट’ अशा भावनिक आणि निर्वाणीच्या शब्दांमध्ये पायलनं आपली व्यथा या नोटमध्ये लिहिली आहे. पायल ज्या विभागात काम करत होती, तेथील विभागप्रमुखांना हा प्रकार थांबवता आला असता हे यावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता विभागप्रमुख देखील पोलिसांच्या रडारवर आले आहेत.


आता मला फक्त शेवट दिसतोय ! पायलच्या सुसाईड नोटचा मराठी अनुवाद

आई आणि बाबा, आत्महत्या केल्याबद्दल मला माफ करा. मला माहितीये की मी तुमच्यासाठी किती प्रिय आहे. पण आत्ता या परिस्थितीत मला हे सहन होत नाहीये. मी एक क्षणदेखील त्या तिघींसोबत घालवू शकत नाही. गेल्या वर्षभरापासून आम्ही (पायल आणि स्नेहल) हे सर्व सहन करतोय. याच आशेवर की एक ना एक दिवस परिस्थिती बदलेल. पण आता मला फक्त शेवट दिसतोय. यातून काहीही मार्ग निघू शकत नाहीये.

माझा प्रत्येक दिवस सारखाच जातोय. हे असं का आहे? त्यांना आम्हाला त्रास द्यावासा का वाटतो? मी सर्वकाही प्रयत्न केल्यानंतर हा (आत्महत्या करण्याचा) निर्णय घेतला आहे. आमच्या मदतीसाठी या डिपार्टमेंटमध्ये कुणीही नाही. ही आमचीच चूक आहे. मीच ही फील्ड निवडली होती. मला गायनेकॉलॉजिस्ट व्हायचं होतं. मला एका चांगल्या संस्थेमध्ये शिकायला मिळेल या आशेवर मी इथे आले होते. पण आता लोकांनी त्यांचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे. सुरुवातीला मी आणि स्नेहलनं यावर कुणालाही काही सांगितलं नाही. पण आता परिस्थिती इतकी बिघडली आहे की सहन होत नाहीये. मी त्यांच्याविरोधात तक्रार देखील केली. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. परिस्थितीत बदल झाला नाही. रुग्णालयात येणारे रुग्ण, कर्मचारी या सगळ्यांसमोर रोज आमचा अपमान होतो. त्यांनी असंच जाहीर केलं आहे की त्या जोपर्यंत नायर हॉस्पिटलमध्ये आहेत, तोपर्यंत मला काहीही शिकू देणार नाही असं त्यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे माझं व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्य उध्वस्त झालं आहे.

मला मुद्दाम पीएमसी वॉर्डमध्ये पोस्टिंग दिलं. जेणेकरून मी एएनसी आणि गयनॅक पेशंटबद्दल काहीही शिकू शकणार नाही. मला गेल्या ३ आठवड्यांपासून लेबर रूमदेखील वापरण्यापासून अडवलं गेलं, कारण काय तर त्यांना मी त्यासाठी पात्र वाटत नाही. ओपीडीच्या वेळेत देखील मला लेबर रूमच्या बाहेरच थांबायला सांगितलं जातं. त्यांनी मला कम्प्युटरवर एचएमआयएसच्या नोंदी करायला सांगितलं आहे. ते मला पेशंटला तपासू देत नाहीत. मी फक्त क्लेरिकल काम करत आहे. शक्य ते सर्व प्रयत्न करून देखील परिस्थिती सुधरत नाहीये, पण माझी मानसिक अवस्था मात्र बिघडत चालली आहे. इथलं वातावरण चांगलं नाही. आणि ते कधी सुधारेल याच्या माझ्या आशा संपल्या आहेत. त्याविरोधात आवाज उठवून देखील त्यातून काहीही निष्कर्ष निघू शकणार नाहीये.

मी हेमा अहुजा, भक्ती मेहेरे आणि अंकिता खंडेलवाल या तिघींना माझ्या आणि स्नेहलच्या या परिस्थितीसाठी जबाबदार धरते आहे. या तिघींनी विभागातील ए. एच. ओ. विभागप्रमुख आणि प्राचार्य यांच्यासमोर आमची चुकीची प्रतिमा तयार केली होती. मी अनेकदा प्रयत्न करून या सगळ्या प्रकाराविषयी मॅडमसोबत बोलले. पण त्यावर काहीही झालं नाही. मला खरंच यातून काहीच मार्ग दिसत नाही. मला फक्त शेवट दिसतोय. मी माझे आई – बाबा आणि हितचिंतकांची माफी मागते. मला माहीत नाही स्नेहल त्या तिघींशी कशी सांभाळून घेईल. स्नेहल, तुला त्यांच्यासोबत सोडून जात असल्याबद्दल मला माफ कर.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!