Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

काश्मीर प्रश्न भारत आणि पाकिस्तान या दोघांच्या द्विपक्षीय चर्चेतूनच सुटेल : एस. जयशंकर

Spread the love

काश्मीर प्रश्न भारत आणि पाकिस्तान या दोघांच्या द्विपक्षीय चर्चेतूनच सुटेल. तो प्रश्न सोडवण्यासाठी तिसऱ्या कोणत्याही पक्षाशी चर्चा केली जाणार नाही असा खुलासा आज परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी संसदेत केला आहे. काश्मीर प्रकरणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यावरून आज विरोधकांनी संसदेत गोंधळ घातला. याप्रकरणी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणीही विरोधकांनी केली आहे.
काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी भारत-पाकमध्ये मध्यस्थी करण्यासाठी आपण तयार आहोत आणि नरेंद्र मोदींनी आपल्याला तशी विनंतीच केली आहे अशा आशयाचं ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी केलं होतं. या वक्तव्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सर्व बाजूंनी टीका केली जात होती. यामुळेच संसदेत आज काँग्रेसच्या खासदारांनी गोंधळ घातला. पंतप्रधान मोदींनी याबद्दल स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी करण्यात आली. विरोधकांच्या गोंधळानंतर या सगळ्या प्रकाराबद्दल परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी खुलासा केला आहे.
पंतप्रधान मोदींनी अशी कोणत्याही प्रकारची विनंती डोनाल्ड ट्रम्प यांना केली नसल्याचं एस जयशंकर यांनी सांगितलं. तसंच काश्मीर प्रश्न भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय चर्चेतूनच सुटेल तिसरा कोणताही पक्ष या दोघांमध्ये येणार नाही अशी भूमिकाही एस. जयशंकर यांनी मांडली.  तरीही विरोधकांनी आपला गोंधळ चालूच ठेवला. ट्रम्प यांच्या विधानावरून गोंधळ करत संसदेचं कामकाज स्थगित करण्याची मागणीही विरोधकांनी केली. तर मोदींनी देशाचा विश्वासघात केला आहे असा आरोप काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. विरोधकांच्या गोंधळामुळे दुपारी बारा वाजेपर्यंत राज्यसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!