औरंगाबादकरांची सहिष्णूतेची भूमिका योग्यच – पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद

Advertisements
Advertisements
Spread the love

गेल्या आठवड्यात घडलेल्या दोन घटनांमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या दोन्ही घटनांच्या पाश्र्वभूमीवर औरंगाबादकरांनी सहिष्णूतेची भूमिका घेतल्यामुळेच पुढील अनर्थ टळला असल्याचे प्रतिपादन पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी मंगळवारी (दि.२३) पत्रकार परिषदेत केले. शहराचा सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष असून त्यांची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
झोमॅटो डिलेव्हरी बॉय आणि चार तरूणात झालेल्या वादानंतर आझाद चौकात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून घेवून चार जणांना अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे, मात्र आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळत आहे. हे प्रकरण निव्वळ रस्त्यावरील भांडण होते असे देखील समोर येत असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले. अशा किरकोळ घटनांना काही जण जातीय भांडणाचा रंग देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात झालेल्या दोन घटनांमुळे शहरातील वातावरण बिघडू पाहत होते परंतु औरंगाबादच्या नागरीकांनी सहिष्णूता दाखवली याबद्दल औरंगाबादकरांचे कौतूक करावे तितके कमीच असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. गेल्या आठवड्यात झालेल्या दोन्ही घटनांचा सखोल तपास सुरू असून या दोन्ही प्रकरणात जाणून-बुझून चुकीची तक्रार देण्यात आली आहे. दोन्ही प्रकरणात फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीची बारकाईने चौकशी करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Advertisements

आझाद चौकात रविवारी रात्री जमलेला जमाव हा कोणत्याही एका राजकीय पक्षाच्या कार्यकत्र्यांचा नव्हता. त्यामुळे विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते जमा झाले होते, हे म्हणणे गैर असल्याचे पोलिस आयुक्त प्रसाद यांनी सांगितले. तसेच या प्रकरणातील फिर्यादी व आरोपी हे कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधीत नसल्याचे देखील यांनी यावेळी स्पष्ट केले. आझाद चौकात झालेल्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी हस्तगत केले असून यामध्ये फिर्यादी व आरोपी यांचा केवळ १ मिनिटाचा संवाद झाला असल्याचे दिसून येत आहे. घटनास्थळी असलेल्या व्यक्तींकडून माहिती गोळा करण्यात येत असून यामध्ये खोटी तक्रार अथवा बनाव असल्याचे सिध्द झाल्यास खोटी तक्रार देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिला आहे. गेल्या काही दिवसापासून युट्युबवर वेगवेगळे प्रकारचे व्हीडीओ व्हायरल झाले आहेत. अफवा पसरविणाऱ्या  व्हीडीओवर शहरवासीयांनी विश्वास ठेवू नये. नागरीकांनी पोलिसांकडे आलेल्या व्हीडीओची शाहनिशा करावी. खोटी माहिती प्रसारीत करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार