Mumbai MTNL इमारतीत अडकलेले ८४ कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश

Spread the love

मुंबईत आगीच्या घटनांची मालिका सुरूच असून आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास वांद्रे येथील एमटीएनएलच्या ९ मजली इमारतीत आगडोंब उसळला. इमारतीच्या तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर आग लागल्याने मोठ्या प्रमाणात कर्मचारी अडकले होते. शर्थीच्या प्रयत्नांनंतर ८४ कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. दरम्यान, बचावकार्यादरम्यान सागर दत्ता साळवे (२५) या अग्निशमन जवानाचा श्वास गुदमरल्याने त्याला भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे.

अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण आणण्यात यश मिळवलं आहे. इमारतीत अडकलेल्या ८४ कर्मचाऱ्यांना आतापर्यंत बाहेर काढण्यात आले आहे. सध्या कुलिंगचं काम सुरू असून प्रत्येक मजल्यावर शोध घेतला जात आहे. अजूनही काही प्रमाणात धूर असल्याने ऑक्सिजन मास्क लावून अग्निशमन जवान इमारतीत शिरले आहेत. हॅलोजन, टॉर्च याच्या साह्याने शोध सुरू आहे. दरम्यान, या आगीमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

आपलं सरकार