शाळेचे दप्तर मागितले हाच काय तो गुन्हा , बापाने दोन मुलांना पाजले विष !!

Spread the love

नाशिकमध्ये जन्मदात्या आईने स्वत:च्या मुलीची गळा चिरुन हत्या करून हल्ल्याचा बनाव केल्याची घटना ताजी असताना जन्मदात्या बापानेच आपल्या दोन मुलांना क्षुल्लक कारणावरून विष पाजल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. शाळेचे दप्तर मागितलं म्हणून जन्मदात्या बापाने आपल्या दोन मुलांना विष पाजले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात आरोपी बापा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही मुलांवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

नाशिक जिल्ह्यातील शिंदे पळसे या गावात ही संतापजनक घटना घडली आहे. ऋषिकेश बोराडे आणि निकिता बोराडे या दोन्ही मुलांवर उपचार सुरू आहेत. शाळेसाठी लागणारी वही, पुस्तक, दप्तर मागितल्याने नराधम बापाने आपल्या मुलांना विष पाजले. ऋषिकेश बोराडे याने दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी आरोपी पंढरीनाथ बोराडे या नराधम बापाला अटक केली आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश माइनकर यांनी सांगितले की, ऋषिकेश आणि निकिताला अत्यावस्त अवस्थेत नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती सिव्हिल सर्जन डॉ. सी.एस. जगदाळे यांनी दिली आहे. दरम्यान, शालेय साहित्य मागितल्याच्या किरकोळ कारणामुळे स्वत:च्या मुलांना विष पाजण्यात आल्याच्या घटनेने नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान याच नाशिक शहरात  जन्मदात्या आईनेच आपल्या १४  महिन्यांच्या चिमुरडीची हत्या केल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती. योगिता पवार असे निर्दयी आईचे नाव आहे. तिला पोलिसांनी अटक केली आहे. स्वरा असे मृत चिमुरडीचे नाव होते. स्वराच्या रडण्याचा योगिता हिला कंटाळा आला होता. त्यामुळे तिने स्वराचा गळा आवळला. मुलीची हत्या केल्यानंतर तिने स्वतःच्या हातावर जखमा केल्या. अनोळखी व्यक्तीने घरात घुसून स्वराची हत्या केल्याचा बनावही तिने केला होता. उच्चभ्रू कुटुंबातील या घटनेने नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती.

आपलं सरकार