Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मॉब लिंचिंगपीडितांच्या कुटुंबीयांच्या वेदना ऐकून सुन्न झाले नासिरुद्दीन शहा

Spread the love

खरं तर मी आज बोलायला आलो नव्हतो. केवळ मॉब लिंचिंगपीडितांच्या कुटुंबीयांच्या वेदना ऐकायला आलो होतो. प्रत्येकांनी जे भोगलं ते ऐकून मन हेलावून गेलं. काही वेळ सुन्न झालं, असं प्रसिद्ध अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी सांगितलं. ‘देशभरातील वाढत्या झुंडबळीच्या घटना आणि द्वेषाचे राजकारण’ विषयावर डेमोक्रेटिक युथ फेडरेशनने आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिसंवादाला संबोधित करताना ते बोलत होते.

या कार्यक्रमाला मॉब लिंचिंग आणि द्वेषाच्या राजकारणाला बळी पडलेल्यांचे कुटुंबीय आले होते. त्यात नितीन आगे यांचे वडील राजू आगे, पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंग यांचे कुटुंबीय रजनी सिंग, अभिषेक प्रताप सिंग, शेरी प्रताप सिंग, जुनैद खान यांचे कुटुंबीय मोहम्मद नफीस आणि मोहम्मद कासम, मोहसीन शेख यांचे कुटुंबीय शाहनावज शेख, आयुब मेवता यांचे कुटुंबीय आरिफ मेवता, अमित वायतांडे यांचे वडील विलास वायतांडे आणि लैंगिक शोषण आणि जातीयतेला बळी पडलेल्या सत्यभामा आदी उपस्थित होते. या सर्वांनी त्यांची मनोगत व्यक्त करतानाच परिस्थितीशी कसा सामना करावा लागला हे स्पष्ट केलं. पीडीतांचं दु:ख ऐकल्यानंतर अभिनेते नसीरुद्दीन शहा गहिवरून गेले होते. या लोकांनी जे सोसलं आणि ज्या परिस्थितीत सोसलं त्याची कुणालाही कल्पना करता येणार नाही. त्यांनी जे सोसलं ते आपण कधीच सोसू शकत नाही. त्यांचं दोन टक्के दु:खही आपल्या वाटेला आलं नाही, असं सांगतानाच तुमच्या धैर्याला माझा सलाम आहे आणि मी नेहमीच तुमच्यापाठीशी उभा राहिल, असं शहा यांनी स्पष्ट केलं.

मागे मी एक वक्तव्य केलं होतं. त्यावरून माझ्यावर टीका झाली. मला गद्दार म्हटलं गेलं. देश सोडून जाण्यास सांगितलं गेलं. पण माझ्यावर जी टीका केली गेली, मला अपमानित केलं गेलं, त्यापेक्षा या लोकांनी खूपच सहन केलंय. त्याची कल्पना करणंही शक्य नाही, असंही ते म्हणाले. यावेळी माजी न्यायाधीश गोपाल गौडा, सुभाषिनी अली, डॉ. राम पुनियानी, अॅड. मुक्ता दाभोलकर, तिस्ता सेटलवाड, श्वेता भट्ट, मरियम ढवळे, प्रतिमा जोशी आणि कलिम सिद्दीकी उपस्थित होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!