Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचं निधन , मान्यवरांची श्रद्धांजली

Spread the love

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचं आज प्रदीर्घ आजारानं निधन झालं. त्या ८१ वर्षाच्या होत्या. देशभरात काँग्रेसची वाताहत होत असताना शीला दीक्षित यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या निधनामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दीक्षित यांच्या निधनावर काँग्रेसमधून शोक व्यक्त होत आहे.  शीला दीक्षित या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. आज सकाळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने फोर्टीस एस्कॉर्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. फोर्टीस एस्कॉर्ट रुग्णालयाचे चेअरमन आणि डॉ. अशोक सेठ यांच्या नेतृत्वाखालील पथक त्यांच्यावर उपचार करत होतं. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत तात्पूरती सुधारणाही झाली होती. मात्र त्यांना पुन्हा हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली, असं फोर्टीस एस्कॉर्ट रुग्णालयाने जारी केलेल्या मेडिकल बुलेटीनमध्ये म्हटलं आहे.

शीला दीक्षित यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक काळ १५ वर्ष काम पाहिलं. त्या १९९८ पासून ते २०१३ पर्यंत दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. त्यांच्या नेतृत्वाखाली तीन वेळा काँग्रेसने दिल्लीत सत्ता स्थापन केली. ३१ मार्च १९३८ मध्ये पंजाबच्या कपूरथलामध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी दिल्लीच्या कॉन्व्हेंट ऑफ जीझस अँड मेरी स्कूलमधून शिक्षण घेतलं. त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस कॉलेजमधून मास्टर्स ऑफ आर्ट्समध्ये पदवी घेतली. त्यांनी १९८४ ते १९८९ पर्यंत उत्तर प्रदेशातील कन्नौजच्या खासदार म्हणूनही काम पाहिलं. दिल्लीचा चेहरामोहरा बदलण्याचं सर्व श्रेय दीक्षित यांना जातं. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी दिल्लीचा विकास केला. केरळच्या राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. त्यांनी संयुक्त राष्ट्र आयोगात ५ वर्ष भारताचं प्रतिनिधीत्व करून महिलांच्या समस्येकडे संयुक्त राष्ट्राचं लक्ष वेधलं. सध्या दिल्ली काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे होती.

दीक्षित या कुशल संघटकही होत्या. २००८च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने अभूतपूर्व विजय मिळविला होता. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने ७० पैकी ४३ जागांवर दणदणीत विजय मिळविला होता. राजकारणाबरोबरच सामाजिक क्षेत्रातही त्यांनी मोठं योगदान दिलं. त्यांच्या निधनामुळे उत्तम राजकीय नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शीला दीक्षित यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांच्या निधनाची बातमी ऐकून दु:ख झालं. त्यांनी दिल्लीचा चेहरामोहरा बदलला, त्यासाठी नेहमीच त्यांचं स्मरण केलं जाईल, असं राष्ट्रपतींनी शोक संदेशात म्हटलं आहे. तर शीला दीक्षित यांचं व्यक्तिमत्त्व सुस्वभावी होतं. दिल्लीच्या विकासासाठी त्यांनी अभूतपूर्व काम केलं, अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून व्यक्त केली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही दीक्षित यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. शीलाजींच्या निधनाची बातमी ऐकून प्रचंड दु:ख झालं. त्या काँग्रेस कन्या होत्या. त्यांच्याशी माझे व्यक्तिगत संबंध चांगले होते. त्यांचे कुटुंबीय आणि दिल्लीच्या नागरिकांप्रती मी संवेदना व्यक्त करतो, अशा शब्दात राहुल गांधी यांनी शीला दीक्षित यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

दीक्षित यांच्या निधनामुळे दिल्लीचं प्रचंड नुकसान झालं आहे. दिल्लीच्या विकासात त्यांचं मोठं योगदान होतं, अशा शब्दात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शोक व्यक्त केला. तर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीही दीक्षित यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!