Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अभिव्यक्ती : अलविदा_पँथर !! समाज चिंतक,साहित्यिक, कवी,समीक्षक असलेल्या राजा ढालेंना आदरांजली !

Spread the love

ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत , समाज चिंतक, साहित्यिक, कवी, समीक्षक राजा ढाले यांचे आज निधन झाले. त्यांच्या जाण्यामुळे आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे.  आपल्या विचारांचा, साहित्याचा बाजार न मांडता राजकीय व्यवहारवाद आणि अनैतिक तडजोडीपासून राजभाऊ नेहमी चार हात दूरच राहिले. प्रसंगी त्यांनी आपल्या मित्रांना सोडले पण तत्वाशी कधीही तडजोड केली नाही. असा हा तत्वाशी निष्ठा राखणारा विचारवंत होणे नाही . त्यांना आदरांजली अर्पण करणारा डॉ.रमा दत्तात्रय गर्गे यांचा हा विशेष लेख प्रसिद्ध करीत आहोत. : संपादक


पन्नासच्या दशकात जन्मलेला एक मुलगा,वयाच्या सहाव्या वर्षी सांगलीतून मुंबईत येतो. त्याच्या चुलत्याने त्याला शिक्षण द्यावे म्हणून बोटाला धरून आणलेले असते!

तो हे वातावरण समजून घेऊ लागतो.त्यात रममाण होतो.शिक्षणाने मनाची,आत्म्याची,बुद्धीची कवाडे उघडू लागतात.शब्द हाका घालतात,रंग बोलावतात.लहान वयात हा सूंदर चित्रे काढतो,उत्तम वळणदार अक्षर घटवतो,कविता लिहू लागतो!

मुबंईत त्याच्या या क्षमतेला ओळखणारी अप्पा रणपिसे ,अडसूळ यांच्या सारखी माणसे त्याला भेटतात,आणि मग महाराष्ट्र दलित साहित्य संघात याचा प्रवेश होतो! १९५८  साली भरलेल्या पहिल्या साहित्य संमेलनात हा तरुण सर्वांचे लक्ष वेधून घेतो ! छपाईचे पैसे वाचावे म्हणून एकटाकी हस्तलिखिते तयार करणाऱ्या या तरुणाचे नाव #राजा_ढाले!!

नंतर तो सिद्धार्थ महाविद्यालयात प्रवेश घेतो.मूलतः कवी वृत्तीचा ,खूप वाचणारा हा बुद्धिमान युवक ,प्राध्यापक रमेश तेंडुलकरांचा लाडका होतो. इथेच आपले आवडते साहित्यिक चिं. त्र्यं .खानोलकर त्याला भेटतात. त्यांच्या कविता तो तोंडपाठ म्हणून दाखवतो. त्यांच्या सोबतीने तो लिट्ल मॅगझिन परिवारात सामील होतो. येथे भाऊ पाध्ये,मधु दण्डवते, भालचंद्र नेमाडे भेटतात.

आता लिहिणं हेच बंड वाटू लागते, अगदी गाजलेल्या सत्यकथेवर तिचीच सत्यकथा असा मुद्देसूद लेख लिहून, आणि अनियतकालिके काढून आपल्या आतल्या आवाजाला न्याय देतो. सिद्धार्थ कॉलेज होस्टेलवर ज. वि. पवार,नामदेव ढसाळ यांचे मैत्र लाभते !

आणि बावड्याला दलितांवर बहिष्कार घातल्याची घटना घडते.युक्रांदच्या सोबतीने सनदशीर लढा देऊन तिथल्या दलितांना न्याय मिळवून दिला जातो!

पण राजा ढाले अस्वस्थ होतात! विचार करू लागतात, माझ्या बांधवांनी हाक मारली तर कोण धावणार? आहे का आपले संघटन? युक्रांदची साथ आज लाभली, पण त्यांचा आधार नेहमीच का मानावा? आपले बळकट हात हवेत,आपल्या माणसांना आधार देणारे!! नुसतेच पेरूमल कमिशनवर चर्चा इतकेच पुरे? मार्टिन ल्युथर किंग मारला गेला की आपण अस्वस्थ होतो, आणि इथे रोज घडणाऱ्या अन्यायकारक गोष्टींची दखलच घेत नाही! आज मला मिळालाय मोकळा श्वास, स्वतंत्र लेखणी,पण या आधीचे किती श्वास आणि किती लेखण्या स्वातंत्र्या अभावी गाडल्या गेल्या असतील? आणि मग त्यातून जन्म होतो #दलित_पँथरचा!! एक वेगळी अभिनव संकल्पना!!ही सगळी संरचना ज्यांनी तयार केली त्या राजा ढालेंचे नाव सुरुवातीला संस्थापक म्हणून लिहिले गेले नाही, पण खरा कार्यकर्ता नावासाठी काम करत नसतो. ढाले कधी बोलले नाहीत!
(२००२  साली नवशक्तीच्या भाऊ जोशींनी,राजा ढालेंचे श्रेय अखेर  त्यांच्या झोळीत घातले!)

१९७२  साली वर्षा बंगल्यावर मोर्चा ठरला.पोलिसांनी राजभवनाचा मार्ग अडवला,तर डोंगर चढून, उतरून हे पॅन्थर्स मुख्यमंत्री निवसावर पोहोचले आणि हा मोर्चा महाराष्ट्र भर गाजला ! पँथरने राजकीय नेतृत्वाचे लक्ष वेधून घेतले.

नवा आत्मविश्वास असलेली,व्यवस्था परिवर्तनासाठी झटणारी दलित तरुण मंडळी , त्यांचे कार्य याची वृत्तपत्रांनी दखल घेतली!

मात्र आंबेडकरी त चळवळीला ऐक्यभंगाचा शाप आहे. बुद्धिझम की कम्युनिझम या ढाले ढसाळ वादात पँथर विखुरले, आणि आंबेडकरी  चळवळीच्या एका तेजस्वी पर्वाची सांगता झाली. नंतर त्यांनी निवडणूका लढवल्या, राजकिय संन्यास घेतला! पण पँथरच्या काळातले ढाले तसेच राहिले, शुद्ध सैनिक!!

राजा ढालेंचे मते स्पष्ट होती! वंचितांना , सर्व मागास घटकांनी केवळ आणि केवळ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मार्गावर चालावे! अगदी बौद्ध भिक्षु पुरोहितशाहीला पण त्यांचा विरोध होता.ते म्हणत कशाला हवा बौद्ध विवाह कायदा? कोर्टमॅरेज करावे. त्यांना बहुजनवाद अमान्य होता, त्यांच्या मते मागासवर्गीयांना  वेगळे एकक मानूनच काम केले पाहिजे!

त्यांचा बौद्ध धम्माकडे आणि प्रवर्तनाकडे पहाण्याचा दृष्टिकोन विशाल होता! जागतिक स्तरावरचा विचार ते करत असत. जपानमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारला तेव्हाचा त्यांना झालेला आनंद अवर्णनीय होता! आपल्या लाडक्या कन्येचे नाव त्यांनी #गाथा ठेवले!

बाबासाहेब आंबेडकरांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित व्हावे यासाठी जीवाची बाजी लावली! कधी पद्धत बदलली,कधी मार्ग बदलला पण सूर्याकडे चालणे अविरत ठेवले. नीती सोडली नाही! पंचशील आणि चारिकेला प्राणात स्थापन केले!

समाज चिंतक,साहित्यिक, कवी,समीक्षक असलेल्या राजा ढालेंना आदरांजली!
अलविदा पँथर•••

डॉ.रमा दत्तात्रय गर्गे

आपलं सरकार

Click to listen highlighted text!