Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

प्रियकराकडून प्रेयसीचा भरदुपारी चाकूने भोसकून खून

Spread the love

ग्रामीण भागात राहणार्‍या एका युवतीचा शहरातील भररस्त्यात चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची थरारक घटना आज मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास येथील गोपालप्रभा मंगल कार्यालयासमोर एका बोळीमध्ये घडली. अर्पिता दत्ता ठाकरे (१९) असे मृत युवतीचे नाव असून ती भातकुली तालुक्यातील कवठा बहाळे येथील रहिवासी आहे. तुषार किरण मसकरे (२०, मलकापूर, भातकुली) असे तिची हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. या घटनेत अर्पिताला वाचवण्याच्या प्रयत्नात तिची मैत्रीणही जखमी झाली आहे.

अर्पिता ठाकरे व तुषार मसकरे यांची शालेय जीवनापासून ओळख होती. अर्पिता ठाकरे शहरातील भारतीय महाविद्यालयात बी.कॉम. प्रथम वर्षाला शिकत होती. आज मंगळवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास ती तिच्या मैत्रीणीसोबत राजापेठ जवळील गोपालप्रभा मंगल कार्यालयानजीकच्या शाह कोचींग क्लासेस येथे शिकवणी वर्गाला गेली होती. तिथून परतताना तुषार मसकरे याने तिला रस्त्यात गाठले. यावेळी काही मिनिटे त्याने तिच्याशी बातचीत केली. परंतु अचानक त्याने त्याच्याजवळील चायना चाकूने तिचे पोट, मान व गळ्यावर सपासप वार केले. यावेळी तिच्या मैत्रीणीने अर्पिता हिचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपीने अर्पिताच्या मैत्रीणीवर देखील हल्ला केला. यात तिच्या हाताला गंभीर जखम झाली. तुषार मसकरे यांने चाकूने भीषण हल्ला चढविल्याने अर्पिता रक्तबंबाळ होऊन पडली. यानंतर हल्लेखोर तुषार मसकरे याने तेथून धूम ठोकली. धावत असतांना त्याने अंगातील शर्ट काढून टाकला. याशिवाय डोक्यावर एक मुस्लिम बांधवांसारखी दिसणारी घातलेली टोपीदेखील त्याने काढून फेकली. अर्पिता हिच्यावर हल्ल्याचा प्रकार नजरेस पडताच परिसरातील नागरिक तुषार मसकरे याच्या मागे धावले. काही नागरिकांनी जखमी अर्पिता ठाकरे हिला ऑटो रिक्षाने जिल्हा सामान्य रूग्णालयात आणले. परंतु गंभीर जखमी झालेल्या अर्पिता हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान, अर्पिता ठाकरे हिचा भररस्त्यात खून झाल्याची माहीती मिळताच खासदार नवनीत राणा या तातडीने जिल्हा सामान्य रूग्णालयात पोहोचल्या. अर्पिता हिचे वडील, भाऊ, नातेवाईक व गावातील नागरिक मोठ्या संख्येने जिल्हा सामान्य रूग्णालयात पोहोचले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त यांनी राजापेठ पोलीस ठाणे गाठले. आरोपी युवकाची त्यांनी चौकशी केली.
या घटनेबाबत पोलीस आयुक्त संजय बावीस्कर यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अर्पिता ठाकरे व तुषार मसकरे यांची जुनी ओळख असल्याचे सांगितले. आरोपी व अर्पिता यांना विवाह करायचा होता परंतु दोघेही सज्ञान नसल्याने त्यांनी एका मंदिरात विवाह केला होता. आरोपीने तुषार याने अर्पिताच्या वडिलांकडे अर्पितासाठी मागणी घातली होती. परंतु त्याला त्यांनी विरोध केला. त्याच्या मोबाईलमध्ये अर्पिताचे काही फोटो देखील होते. याप्रकरणी युवतीने बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलीसांनी तुषार याला समज दिली. यावेळी तुषारने आपण यापुढे अर्पिता हिला त्रास देणार नाही असे लिहून दिले होते. त्याच्या मोबाईलमध्ये असणारे फोटो देखील डिलीट केले होते. परंतु त्यानंतर आज मात्र त्याने अर्पिता हिचा भररस्त्यातून खून केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!