Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ज्या घरासाठी आमदार आकाशने पालिका अधिकाऱ्यावर बॅट हल्ला केला अखेर ते घर कोर्टाच्या आदेशाने झाले जमीनदोस्त !!

Spread the love

मध्यप्रदेशातील इंदूर महापालिकेच्या अधिकाऱ्याला बॅटने मारहाण करणाऱ्या भाजपा आमदार आकाश विजयवर्गीय यांना महापालिकेने चांगलाच झटका दिला आहे. ज्या घरासाठी त्यांनी मारहाण केली होती, तेच घर जमीनदोस्त करण्यात आले आहे. २६ जून रोजी जेव्हा पालीकेचे अधिकारी ही इमारत पाडण्यासाठी आले होते. त्यावेळी वाद होऊन आकाश विजयवर्गीय यांनी क्रिकेटच्या बॅटने एका अधिकाऱ्यावर हल्ला चढवला होता. तत्पूर्वी, मध्य प्रदेशच्या हायकोर्टाने या इमारतीला जमीनदोस्त करण्याच्या इंदूर महापालिकेच्या निर्णयाला स्थगिती देणारी याचिका फेटाळून लावली होती.

या कारवाईमुळे विस्थापित होणाऱ्या कुटुंबीयांना दिलासा देताना कोर्टाने पालिकेला आदेश दिले होते की, ही इमारत जमीनदोस्त करण्यापूर्वी त्यात राहणाऱ्या कुटुंबांना दोन दिवसांच्या आत तत्पुरत्या निवासाची सोय करण्यात यावी. हायकोर्टाच्या इंदूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित आर्य यांनी सुमारे सव्वा तास दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर यावर निर्णय दिला होता. त्यानुसार, ही इमारत खूपच जुनी झालेली असल्याने ती जमीनदोस्त करणे हे जनतेच्याच सुरक्षेसाठी असल्याचे मान्य करीत परवानगी दिली होती.

दरम्यान, विजयवर्गीय यांच्या या कृतीचे सर्वच स्तरातून निषेध व्हायला लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली होती. भाजपाच्या संसदीय पक्ष बैठकीत बोलताना नरेंद्र मोदी यांनी अशा प्रकारची वागणूक अस्वीकार्य आहे. मग तो कोणाचाही मुलगा असो अशा शब्दांत खडसावले होते. तसेच आकाश विजयवर्गीय यांची कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याचं स्वागत करणाऱ्या स्थानिक भाजपा युनिटला बरखास्त केलं पाहिजे असेही मोदींनी म्हटले होते. अशा नेत्यांची पक्षातून हाकलपट्टी केली पाहिजे असे मतही त्यांनी व्यक्त केले होते. पावसाचा संभाव्य धोका लक्षात घेत प्रशासनाने या परिसराती जुनी घर व इमारती पाडण्याची मोहीम हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवरच हे अधिकारी कारवाई करण्यासाठी आले होते. आकाश विजयवर्गीय हे या अगोदर देखील वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधातही त्यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. ते सध्या इंदुर-३ विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. तर त्यांचे वडिल कैलाश विजयवर्गीय हे राष्ट्रीय राजकारणात सक्रीय आहेत. शिवाय पश्चिम बंगालचे प्रभारी म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!