Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : शिवसेनेकडे असलेले औरंगाबाद पश्चिम आणि मध्य विधानसभा भाजपाला घेण्याची मागणी

Spread the love

लोकसभा निवडणुकीपाठोपाठ राज्यातील विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती होणार असताना शिवसेनेच्या ताब्यात असलेले औरंगाबाद पश्चिम व मध्य विधानसभा मतदारसंघांसाठी भाजपकडून आग्रह धरला जात आहे. शहर व जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढली आहे, असे सांगत तशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी पक्षनेत्यांकडे केली असल्याची माहिती भागवत कराड यांनी दिली आहे.

उस्मानपुरा येथील भाजपच्या पक्ष कार्यालयात पक्ष संघटन आणि नोंदणी या विषयावर शुक्रवारी शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. उद्योग राज्यमंत्री अतुल सावे, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, सरचिटणीस दिलीप थोरात, सुरेंद्र कुलकर्णी, राजु शिंदे, राजु बागडे, प्रा. राम बुधवंत, विकास कुलकर्णी आदी उपस्थित होते.

राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघात संघटनात्मक शक्ती वाढविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करा, मंडळ, बुथस्तरापासून पक्ष नोंदणी अभियान जास्तीत जास्त राबविण्यात यावे, वन बुथ ३० युथ अभियान राबविण्यात यावे, अशा सूचना पदाधिकाऱ्यांकडून होत असतानाच कार्यकर्त्यांनी औरंगाबाद मध्य व पश्चिम विधानसभा मतदारसंघ भाजपकडे घ्यावा, असा आग्रह धरला.

शहर व जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर पक्षाची ताकद वाढली आहे. पक्षाने या मतदारसंघात निवडणूक लढविल्यास विजय निश्चितच आहे, असा दावाही कार्यकर्त्यांनी केला. त्यावर बोलताना पक्षनेत्यांनी हा विषय पक्षश्रेष्ठींसमोर मांडला जाईल, असे आश्वासन दिले.

दरम्यान, शिवसेना आमदार संजय शिरसाट हे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजयी झालेले आहेत. तर मध्य मतदारसंघात गत निवडणुकीत शिवसेना उमेदवार हे दुसऱ्या क्रमांकावर होते. असे असताना भाजप कार्यकर्त्यांनी या मतदारसंघासाठी आग्रह धरल्याने शिवसेना त्यावर काय भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!