Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ICC World Cup 2019 : भारताची उपांत्य फेरीत धडक, बांगलादेशवर २८ धावांनी मात

Spread the love

विश्वचषक स्पर्धेत बर्मिंघमवर रंगलेल्या रोमहर्षक लढतीत भारताने बांगलादेशवर २८ धावांनी विजय प्राप्त करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीचं तिकीट पक्क केलं आहे. भारताने दिलेल्या ३१५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव २८६ धावांत संपुष्टात आला. भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा सामनावीराचा मानकरी ठरला. रोहितने शतकी खेळी साकारली. रोहितचं यंदाच्या विश्वचषकातलं हे चौथं शतक ठरलं.

भारताने तीनशेहून अधिक धावा केल्या तरी बांगलादेशने भारताला सामन्याच्या ४८ व्या षटकापर्यंत विजयासाठी झुंजवलं. मोहम्मद सैफुद्दीननं अखेरच्या षटकांमध्ये तुफान फटकेबाजी करत झुंजार अर्धशतक ठोकलं. सामन्यात बांगलादेशच्या दिशेने पारडं झुकतं असल्याचं चित्र निर्माण झालं असताना जसप्रीत बुमराहने भारतासाठी तारणहार ठरला. बुमराहने रुबेल हुसेन आणि मुस्तफिजुर रेहमानला क्लीनबोल्ड करत बांगलादेशचा डाव संपुष्टात आणला. सैफुद्दीनची नाबाद ५१ धावांची खेळी व्यर्थ ठरली. बांगलादेशच्या डावात शाकीब अल हसननंही ६६ धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं. या पराभवासह बांगलादेशचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.  तत्पूर्वी, रोहित शर्माच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताला ३१५ धावांचा डोंगर उभारता आला. रोहितने बांगलादेशच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत ९२ चेंडूत १०४ धावांची दमदार खेळी साकारली. यात रोहितनं ७ सुंदर चौकार आणि ५ उत्तुंग षटकार ठोकले. सलामीवीर केएल राहुलनं रोहितला साजेशी साथ देत ९२ चेंडूत ७७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. भारतीय संघाची दमदार सुरुवात पाहता ३५० धावा होतील असं अंदाज होता. मात्र, भारताच्या मधल्या फळीने निराशा केली. कर्णधार कोहलीला मुस्तफिजुरनं २६ धावांवर बाद केलं. तर त्याच षटकात हार्दिक पंड्या शून्यावर माघारी परतला. त्यामुळे भारतीय संघाची पिछेहाट झाली.

ऋषभ पंतने ४१ चेंडूत ४८ धावा करत सामन्यात रंगत आणली होती. पण मोठा फटका मारण्याच्या नादात पंत तंबूत दाखल झाला. दिनेश कार्तिकनंही निराशा केली. कार्तिक अवघ्या ८ धावांवर बाद झाला. महेंद्रसिंह धोनीने अखेरच्या षटकांमध्ये धावा वसुल करण्याचा प्रयत्न केला पण त्याला फारसं यश आलं नाही. धोनीने ३३ चेंडूत ३५ धावा केल्या.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!