Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ICC World Cup 2019 : श्रीलंकेचा वेस्ट इंडिजवर २३ धावांनी विजय

Spread the love

अखेरच्या काही षटकांपर्यंत समसमान पारडे असलेल्या सामन्यात अखेर श्रीलंकेने वेस्ट इंडिजवर २३ धावांनी विजय मिळवला. विंडीजच्या पुरनचे शतक आणि अॅलेनची अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली. श्रीलंकेकडून शतकी खेळी साकारणारा अविष्का फर्नांडो सामन्याचा मानकरी ठरला. विंडीजसमोर श्रीलंकेने ३३९ धावांचे आव्हान ठेवले होते.

या आव्हानाचा पाठलाग करताना विंडिजची सुरुवात चांगली झाली नाही. सुनिल आंब्रिस ५ धावांवर बाद झाला. त्यानंतर शाय होपही तंबूत परतला. विंडिंजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलही फारशी चमक दाखवू शकला नाही. विडिंजचा संघ दारुण पराभवाच्या छायेत असताना पुरन आणि अॅलेन यांच्या खेळीने सामन्याचा नूर पालटला. अॅलेनने धडाकेबाज खेळी करत ३० चेंडूत अर्धशतक झळकावले. चोरटी धाव घेण्याच्या नादात अॅलेन धावचीत झाला. त्यानंतर पुरनने खेळाची सूत्रे हाती घेत विंडिचच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. मात्र, मॅथ्यूजच्या गोलंदाजीवर पुरन झेलबाद झाल्यानंतर विंडिजच्या विजयाच्या आशाही संपु्ष्टात आल्या.

तत्पूर्वी, वेस्ट इंडिजने सामन्याची नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या फलंदाजांनी विंडीजचा निर्णय फोल ठरवत चांगल्या धावा वसूल केल्या. करुणारत्ने आणि परेरा यांनी सलामीसाठी ९३ धावांची भागीदारी केली. करुणारत्ने(३२) बाद झाल्यानंतर अविष्का फर्नांडोने विंडीजच्या गोलंदाजांचा समाचार घेत खणखणीत शतक ठोकलं. फर्नांडोच्या खेळीत ९ दमदार चौकार आणि दोन उत्तुंग षटकारांचा समावेश होता.

अखेरच्या पाच षटकांमध्ये लाहिरू थिरीमाने याने ३३ चेंडूत नाबाद ४५ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून कर्णधार जेसन होल्डरने दोन गडी बाद केले. तर शेल्डन कॉट्रेल, ओशाने थॉमस, फॅबियन अॅलेन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!