Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

बनावट कंपन्या तयार करून १४ हजार ५०० कोटींचा गंडा, संदेसरा ब्रदर्सचा पंजाब नॅशनल बँकेपेक्षाही मोठा घोटाळा

Spread the love

बनावट कंपन्या तयार करून बँकांना हजारो कोटींचा चुना लावणाऱ्या स्टर्लिंग बायोटेक कंपनीचे मालक संदेसरा ब्रदर्सबाबत सक्तवसूली संचलनालयाने (इडी) मोठा गौप्यस्फोट केला आहे. इडीच्या माहितीनुसार, संदेसरा घोटाळा हा पंजाब नॅशनल बँकेपेक्षाही मोठा घोटाळा आहे. इडीच्या सूत्रांनी एएनआयला याबाबत माहिती दिली.

स्टर्लिंग बायोटेक कंपनी लिमिटेड आणि संदेसरा समुहाचे प्रमुख प्रमोटर नितीन संदेसरा, चेतन संदेसरा आणि दिप्ती संदेसरा यांनी बनावट कंपन्या तयार करून बँकांना १४ हजार ५०० कोटींचा गंडा घातला. इडीच्या सूत्रांकडून एएनआयला ही माहिती देण्यात आली. इडीने याप्रकरणी बुधवारी स्टर्लिंग बायोटेकची ९ हजार कोटींपेक्षा अधिक मूल्याची संपत्ती जप्त केली. यामध्ये नायजेरियातील ऑईल रिग, एक जहाज, एक विमान आणि लंडनमधील संपत्ती जप्त केली आहे. यापूर्वी हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी याने पीएनबी बँकेला ११ हजार ४०० कोटींचा गंडा घातला होता.

कारवाई दरम्यान, इडीला अनेक दस्तऐवज मिळाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. यावरून संदेसरा समुहाने शेल कंपनीच्या सहाय्याने भारतीय बँकांच्या परदेशातील शाखांमधून ९ हजार कोटी रूपयांचे कर्ज घेतल्याचे समोर आले होते. तसेच इडीच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार स्टर्लिंग बायोटेक लिमिटेडने भारतीय बँकांकडून भारतीय आणि परदेशी चलनातही कर्ज घेतले होते. संदेसरा समुहाने आंध्रा बँक, यूको बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, अलाहाबाद बँक आणि बँक ऑफ इंडियाकडून हे कर्ज घेतले होते. ऑक्टोबर २०१७ मध्ये संदेसरा समुहावर सीबीआयने एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर इडीनेही त्यांच्यावर खटला दाखल केला होता. सीबीआयने ५ हजार ३८३ कोटी रूपयांच्या घोटाळा आणि मनी लाँड्रींग प्रकरणी संदेसरा समुहावर एफआयआर दाखल केला होता.

विजय माल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी या यादीमध्ये आता नव्या घोटाळ्याची भर पडली आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या ११ हजार ४०० कोटींच्या घोटाळ्याने देशात खळबळ उडाली होती. मात्र, आता स्टर्लिंग बायोटेकच्या रुपाने पीएनबीपेक्षाही मोठा घोटाळा उघड झाला आहे. ईडी अर्थात अंमलबजावणी संचलनालयाने देशभरात स्टर्लिंग बायोटेकच्या विविध ठिकाणच्या मालमत्तांवर टाच आणली आहे. ईडीने टाकलेल्या छाप्यांमध्ये स्टर्लिंग बायोटेतकची तब्बल ९ हजार कोटींपेक्षाही जास्त मूल्य असलेली मालमत्ता आणि संपत्ती ईडीनं जप्त केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!