Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मुंबईत सर्वत्र जोरदार पाऊस , लोकल रेल्वेवर मोठा परिणाम

Spread the love

मुंबईत गेल्या २४ तासापासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून या पावसामुळे  एका बाजूला दिलासा मिळाला असला तरी दुसऱ्या बाजूला मुंबईकरांच्या अचडणी देखील वाढल्या आहेत. शुक्रवारी सकाळी मुंबई आणि उपनगरात सुरु झालेल्या पावसाने अद्याप विश्रांती घेतली नाही. त्यामुळे अनके सखल भागात पाणी साचले आहे. यामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक मंदावली आहे. अर्थात मुंबईकरांना होणाऱ्या या अडचणीचा सामना आणखी २४ ते ४८  तास करावा लागू शकतो. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील २४ मुंबई शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे.

पश्चिम किनारपट्टीवर मान्सून सक्रीय झाला आहे. हवेचा वेग देखील वाढला आहे. त्यामुळेच मुंबई, ठाणे आणि पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस पडत आहे. तर ४ जुलैनंतर पुन्हा एकदा उत्तर कोकणात पावसाला सुरुवात होऊ शकते. स्कायमेटच्या अंदानानुसार बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टा निर्माण झाल्यामुळे पाऊस पडत आहे. शहराच्या तुलनेत उपनगरात अधिक पावसाची शक्यता आहे.

लोकल सेवेवर मोठा परिणाम 

शुक्रवारपासून सुरु झालेल्या पावसामुळे मुंबईतील तिन्ही मार्गावरील लोकल सेवा उशीराने धावत आहेत. मध्य रेल्वेच्या गाड्या २० ते २५ मिनिटे, पश्चिम रेल्वेच्या १० ते १५ मिनिटे तर हार्बर मार्गावरील गाड्या ५ ते १० मिनिटे उशिराने धावत आहेत. रेल्वे सोबत रस्ते वाहतूक ही धीम्या गतीने सुरु आहे. विरार रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म खचल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याण-शीळ फाटा रोडवर ट्रॅफिक जाम झाल्यामुळे या मार्गावर वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. पनवेल, नवी मुंबई आणि ठाण्याकडे जाण्यासाठी वाहनांना वेळ लागत आहे. मुंबई शहरासह अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. मालाड पश्चिमेकडील नजराज मार्केट, एशियन पेंट कंपनी, भांडुप वेस्ट, आर सिटी मॉल या ठिकाणी पाणी साचले आहे. हिंदमाता, अंधेरी सबवे, मालाड सबवे, साकीनाका, सायन, माटुंगा लेबर कँम्प, मिलन सबवे, नॅशनल कॉलेज या ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मुंबई शहरात ११, पूर्व उपनगरात १८ तर पश्चिम उपनगरात २४ अशा एकूण ५३ ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. शहर आणि दोन्ही उपनगरात मिळून १४ ठिकाणी शॉटसर्किटच्या घटना घडल्या आहेत. गेल्या २४ तासात मुंबई शहरात १३३ मिमी, पूर्व उपनगरात २०८ मिमी तर पश्चिम उपनगरात १८७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहर आणि उपनगरात मिळून १४ ठिकाणी घरांच्या भिंती पडल्या आहेत. तर दोन ठिकाणी दरड कोसळली आहे. मुंबईत गेल्या २४ तासापासून पाऊस सुरु असला तरी धरणक्षेत्रात अद्याप पुरेशा पाऊस झालेला नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण आणि तलावात अवघे ०.४ टक्के इतकी पाण्याची वाढ झाली आहे. काल पाण्याची पातळी ४.९१ टक्के इतकी होती ती आता ५.३१ टक्क्यांवर पोहोचली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!