Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : जनश्री विमा घोटाळाप्रकरण : संस्था चालकाने केले तीन हजार बनावट दावे , आतापर्यंत दहा अटकेत, एकाला कोठडी 

Spread the love

केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या जनश्री विमा योजनेचा गैरफायदा घेत सामाजिक संस्थांनी जीवन विमा पॉलीसीला ९९ लाख ३० हजारांचा गंडा घातल्याचा धक्कादायक ३० एप्रिल रोजी समोर आला होता. याप्रकरणी संस्था चालक, बँकांचे कर्मचारी, आयुर्विमा महामंडळाचा वरिष्ठ शाखा अधिकारी तथा तक्रारदार अशा दहा जणांना अद्यापपर्यंत अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, तपासादरम्यान संस्था चालक भारत बोराडे याने तीन हजार बनावट दावे दाखल केल्याचे देखील उघडकीस आले आहे. दरम्यान, याप्रकरणाचा तपास आता पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या आदेशाने आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. नऊ जणांची हर्सुल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तर बोराडे सध्या पोलिस कोठडीत आहे.

भारतीय आयुर्विमा महामंडळाचा वरिष्ठ शाखा अधिकारी भिमराव सपंतराव सरवदे (६०, रा. ईम्पिरीयल हाईट्स, सैनिक कल्याण केंद्राजवळ, प्लॉट क्र. ५१, नंदनवन कॉलनी) याने जनश्री विमा योजनेत नुतनीकरण करताना मृत सदस्यांचे बनावट दावे दाखल करुन आठ संस्था चालकांनी ९९ लाख ३० हजारांचा अपहार केल्याची तक्रार वेदांतनगर पोलिस ठाण्यात दिली होती. हा अपहार ५ ते १८ एप्रिलदरम्यान झालेल्या प्रकरणांच्या चौकशीवेळी समोर आला होता. त्री सदस्यीय चौकशीदरम्यान विभागातर्फे आलेल्या मृत्यू दाव्यांच्या कागदपत्रांमध्ये काही संस्थांनी बनावट व खोटे मृत्यू प्रमाणपत्र सादर केले होते.

याप्रकरणी साई बाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, चैतन्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, प्रसार भारती गृह तारण संस्था, स्वराज्य मराठवाडा कामगार संघटना, श्री. सप्तश्रृंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, साई श्रध्दा समाज व शैक्षणिक बहुउद्देशीय संस्था, विशाल प्रतिष्ठान बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, जय तुळजा भवानी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि  जनकल्याण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष व सचिवांविरुध्द तक्रार नोंदविण्यात आली होती. यात भारत बोराडे याच्या तीन संस्थांचा समावेश होता. त्याने सुमारे तीन हजार सदस्यांच्या विमा पॉलीसीचे बनावट दावे दाखल केले होते. त्याच्यासह अली खान, मोहिन खान, ए. एच. शामकुळे, शंकर गायकवाड, एन. एन. कानडे, सुभान अहेमद, बाळासाहेब झाडे, महेंद्र गडवे या संस्था चालकांचा समावेश होता. याशिवाय बँकेतील शिपाई आणि लिपीकांनी देखील त्यांना बनावट दावे दाखल करण्यासाठी मदत केल्याचे समोर आले होते. तर तक्रारदार भिमराव सरवदे हा देखील बनावट दावा दाखल करुन घेण्यासाठी संमती दर्शवत होता. त्यामुळे याप्रकरणी आतापर्यंत दहा जणांना वेदांतनगर पोलिसांनी अटक केली आहे. आता या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल सातोदकर करत आहेत.
…….

आपलं सरकार

Click to listen highlighted text!