Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भाजपच्या मुख्यमंत्रीपदावर उद्धव ठाकरे यांचे एकच उत्तर , आमचं ठरलंय …

Spread the love

विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधीच शिवसेना भाजपमध्ये पुढचा मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा?, यावरून कुरघोडीचं राजकारण सुरू झालं असून आज प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांनी महाराष्ट्रातील पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच असेल, असे निक्षून सांगितले. विशेष म्हणजे बैठकीत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अन्य नेत्यांनीही हाच सूर लावला. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमचं सगळं काही ठरलं आहे. त्यात आता इतर कुणी तोंड घालू नये’, अशा शब्दात खरमरीत टीका केली आहे.

महाराष्ट्र प्रदेश भाजपाची बैठक आज दादरच्या वसंतस्मृती कार्यालयात झाली. बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील सर्व मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मार्गदर्शन करताना सरोज पांडे यांनी राज्यात पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच असेल असे सांगितले. राज्यात शिवसेनेसोबत युती असली तरी पक्ष संघटना बांधणीचं काम अविश्रांतपणे सुरू राहायला हवं. सर्व २८८ मतदारसंघांमध्ये बुथची बांधणी आपण करायला हवी. सर्व जागा जिंकणं हे आपलं लक्ष्य असलं पाहिजे, असे आवाहन पांडे यांनी केले. गिरीश महाजन यांनीही तोच सूर लावला. लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता राज्यात भाजपच मोठा भाऊ असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्यात पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच व्हावा, ही सर्व कार्यकर्त्यांची भावना असल्याचे महाजन म्हणाले. लोकसभा निवडणुकीत शिवसेना जिथे कमकुवत होती तिथे आम्ही सेनेच्या उमेदवारांना मदत केल्याचा दावाही महाजन यांनी केला. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या मिळून ५० जागाही निवडून येणार नाहीत, असेही महाजन म्हणाले.

आमचं ठरलंय, इतरांनी तोंड घालू नये!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना याबाबत विचारले असता त्यांनी भाजपच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांना सबुरीचा सल्ला दिला. ‘भाजपाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्यात युतीबाबत सगळं काही ठरलं आहे. त्यात आता इतर कुणी तोंड घालू नये’, असे उद्धव म्हणाले. मुख्यमंत्रिपदाबाबत विचारले असता, मुख्यमंत्री कोण होणार, या प्रश्नापेक्षा गोरगरीब शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक महत्त्वाचे आहेत. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा लाभ मिळाला का, उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ किती गरीबांना मिळाला, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला का, शेतकरी कर्जमुक्त झाला का, या प्रश्नांची उत्तरे शोधणे गरजेचे आहे, असेही उद्धव यांनी नमूद केले. शिवसेना सर्वसामान्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सरकारमध्ये आहे. शेतकऱ्यांनी आपलं दुःखं बाजूला ठेऊन आपल्याला लोकसभा निवडणुकीत निवडून दिले आहे, आता त्यांची दुःखं दूर करणे हे आपले कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!