Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

बनावट लेटर ऑफ क्रेडिट जारी करून बँक ऑफ इंडियाची २९३ कोटी रुपयांची फसवणूक, अंमलबजावणी संचालनालयाच्या धाडी

Spread the love

बँकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरत बनावट लेटर ऑफ क्रेडिट (एलसी) जारी करून बँक ऑफ इंडियाची २९३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघड झाला आहे. त्यामुळे पुण्यातही नीरव मोदी प्रकरणासारखेच प्रकरण घडल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने  गुरुवारी व्हॅरॉन अॅल्युमिनियम प्रायव्हेट लिमिटेड तसेच व्हॅरॉन ऑटो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर छापे टाकले. कंपनीच्या पुणे, रत्नागिरी, सांगली आणि नागपूर येथील कार्यालयांवर तसेच संचालकांच्या निवासस्थानांवरही छापे टाकण्यात आले.

बँक ऑफ इंडियाने दिलेल्या तक्रारीनुसार, केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या दोन्ही कंपन्यांच्या विरोधात तक्रार नोंदवली होती. व्हीएपीएल कंपनीचे बँक ऑफ इंडियाच्या कर्वे रस्ता शाखेमध्ये करंट खाते होते. कंपनीचे एक संचालक श्रीकांत सवईकर हेच प्रामुख्याने कंपनीचे कामकाज पाहतात. या कंपनीने कॅनरा बँकेच्या डेक्कन जिमखाना शाखेने जारी केलेल्या लेटर ऑफ क्रेडिटच्या (एलसी) आधारे जारी झालेले काही एलसी व बिल्स बँक ऑफ इंडियाकडे सादर केले. त्याआधारे बँक ऑफ इंडियाने निगोशिएशन व डिस्काउंटिंग केले. त्यापूर्वी बँक ऑफ इंडियाने कॅनरा बँकेच्या डेक्कन जिमखाना शाखेकडून त्याची सतत्या पडताळून घेतली होती. त्यानंतर बँक ऑफ इंडियाने २९३ कोटी रुपये व्हीएपीएलच्या खात्यात जमा केले. त्यानंतर लेटर ऑफ क्रेडिटच्या मुदतपूर्तीवेळी बँक ऑफ इंडियाने कॅनरा बँकेशी संपर्क साधला. त्यावेळी आम्ही संबंधित एलसी तसेच बिल्स हे कॅनरा बँकेच्या ‘स्ट्रक्चर्ड फायनान्शियल मेसेजिंग सिस्टिम’ (एसएफएमएस)मधून जारी केले गेले नसल्याचे कॅनरा बँकेने स्पष्ट केले. त्याचबरोबर त्यापोटी बँक ऑफ इंडियाला कोणतीही रक्कम देण्यास नकार दिला. त्यामुळे बँक ऑफ इंडियाचे नुकसान झाले, असे ईडीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

या तक्रारीच्या आधारे ईडीने ‘प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्डरिंग अॅक्ट’नुसार तपास सुरू केला. या तपासात श्रीकांत पांडुरंग सवईकर यांनी कॅनरा बँकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून बँक ऑफ इंडियाची फसवणूक करण्याचा कट रचल्याचे स्पष्ट झाले. त्यासाठी बनावट एलसी, इनव्हॉइस आणि लॉरी रिसिट्सचा वापर झाला. त्याआधारे बँक ऑफ इंडियाने दिलेली रक्कम विविध खात्यांमध्ये वळवण्यात आली. त्याद्वारे कंपनीची जुनी देणी फेडली गेली. तसेच काही रक्कम मुदत ठेवीत गुंतवण्यात आली. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!