Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मराठी बाणा : खासदार इम्तियाज जलील यांच्यासह महाराष्ट्रातील बहुसंख्य खासदारांनी घेतली मराठीतून शपथ

Spread the love

लोकसभेच्या विशेष सत्रात नवनिर्वाचित खासदारांना शपथ देण्यात आली. या शपथविधी सोहळ्यात औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी खासदारकी आणि गोपनियतेची शपथ मराठी भाषेत घेतली. १७ वी लोकसभेच्या अधिवेशनाला सोमवारी (१७ जुन) प्रारंभ करण्यात आला. पहिल्या दिवशी नवीन खासदारांचा शपथ विधी कार्यक्रम घेण्यात आला. या शपथ विधी कार्यक्रमात विविध राज्यातून निवडून आलेल्या खासदारांनी त्यांच्या भाषेत शपथ घेतली. भाजपाच्या अनेक खासदारांनी संस्कृत आणि हिंदी भाषेत शपथ घेतली. मराठवाडयातील अनेक खासदारांनी मराठी भाषेत शपथ घेतली.

२० वर्षांपासून शिवसेना पक्षाकडे औरंगाबाद जिल्हा होता. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना पराभूत करून एमआयएम पक्षातून निवडून आलेले औरंगाबाद जिल्हयाचे खासदार इम्तियाज जलील यांनीही मराठी भाषेत शपथ घेऊन आपल्या संसदीय कार्याची सुरुवात केली.

‘विधानसभा २०१४ ला औरंगाबाद मध्यमधून निवडून गेल्यानंतर विधानसभेत मराठी भाषेत शपथ घेतली होती. आता दिल्लीत औरंगाबाद जिल्हयातून निवडून आलो आहे. राज्यभाषा मराठी आहे. यामुळे संसदेत मराठी भाषेत शपथ घेतली’, असं जलील म्हणाले. मराठी भाषेत शपथ घेतल्याबाबत त्यांनी अभिमान असल्याचेही सांगितले.

दरम्यान इम्तियाज जलील यांच्याबरोबरच मनोज कोटक, विनायक राऊत, ओमप्रकाश निंबाळकर, प्रितम मुंडे, सदाशिव लोखंडे, नवनीत कौर राणा , श्रीरंग बारणे यांच्यासह अन्य खासदारांनी मराठीतून शपथ घेतली. पूनम महाजन, सुप्रिया सुळे, गावित, नितीन गडकरी, सुधाकर शृंगारे, गोपाळ शेट्टी ह्यांनी हिंदीतून शपथ घेतली तर सुजय विखे, उदयनराजे भोसले ह्यांनी इंग्रजीमधून  आणि  उन्मेश पाटील, सुनील मेंढे ह्यांनी संस्कृत मधून शपथ घेतली.

सोशल मीडियावर #मराठीतशपथ अशा हॅशटॅग ट्रेण्ड झाला होता. महाराष्ट्रातील सर्व ४८ नवनिर्वाचित खासदारांनी मराठीत शपथ घ्यावी अशा मागणीनं जोर धरला होता. मात्र, काही खासदारांनी हिंदी, संस्कृत आणि इंग्रजीमधून शपथ घेतल्यामुळे सोशळ मीडियावर त्यांच्याविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!