Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मेंढरांच्या कळपावर विजेची तार पडल्याने ७७ मेंढ्यांचा मृत्यू , ९ लाख ६० हजाराचे नुकसान

Spread the love

शेतातून गेलेली उच्च दाबाची विद्युत वाहक तार मेंढ्यांच्या कळपावर पडून जवळपास ७७ मेंढ्या व ५ शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. यात मेंढपाळाचे ९ लाख ६० हजाराचे नुकसान झाले आहे. ही घटना शनीवारी पहाटे ३ च्या सुमारास शिवना-टाकळी प्रकल्पाच्या पायथ्याशी जैतापूर शिवारात घडली आहे. वैजापूर तालुक्यातील वाकला येथील कडूबा सुखदेव आयनर, संजय मांगू शिंगाडे, सदा देमा शिंदे, अंबादास देमा शिंगाडे, बाळू देमा शिंगाडे, महादू देमा शिंदे या सहा मेंढपाळ कुटूंब जैतापूर शिवारातील ज्ञानेश्वर पंडीत झाल्टे यांच्या २९६ गट क्रमांकामध्ये रात्री वास्तव्यास होते.

या सर्व मेंढपाळांच्या ८५ मेंढ्या एकत्रित वाघूळ (संरक्षक) करून कळपाने बंदिस्त होत्या व शेजारी ५० फुटांवर मेंढपाळ कुटुंबातील ३० जण झोपलेले असताना पहाटे अडीचच्या सुमारास वादळी वाऱ्याने शेतातून गेलेली उच्चदाबाची ११ के.व्ही.ची विद्युत तार मेंढरांच्या कळपावर पडली, यात ८५ मेंढ्यांचा व काही शेळ्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. दरम्यान विद्युत तार पडल्यानंतर मेंढरांच्या कल्लोळाने मेंढपाळ जागे झाले, पण कळपातून आगीचे लोळ दिसू लागल्याने मेंढपाळानी स्वतःचा जीव वाचवत शेतमालकास कळविले. शेतमालकाने हतनूर सब स्टेशनला कळवून तात्काळ विद्युत पुरवठा खंडीत केला, परंतु तोपर्यंत सर्व मेंढ्यांचा मृत्यू झाला होता.

जैतापूरचे पोलिस पाटील शिवाजी केवट यांनी महसूल व महावितरण यांना या घटनेबाबत कळविले. दरम्यान तहसिलदार संजय वारकड, उपकार्यकारी अभियंता विजय दुसाने, सहाय्यक अभियंता सचिन केदारे, तालुका पशुवैद्यकीय आधिकारी डॉ. रमण इंगळे, सहाय्यक पशुधन आयुक्त (कन्नड) डॉ. डी. एन. महाजन, पशुधन पर्यवेक्षक डॉ. विजय मोखडे, डॉ. चव्हाण, यांनी घटनास्थळी भेट दिली. महसूल मंडळ अधिकारी दिनकर पाटील, तलाठी वंदना भिंगारे, देवगाव ( रंगारी ) पोलिस ठाण्याचे विजय धुमाळ यांनी या घटनेचा पंचनामा केला. मेंढपाळावर ओढवलेले संकंट अत्यंत दुर्दैवी असून लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे उप-कार्यकारी अभियंता विजय दुसाने यांनी यावेळी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!