Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

समृद्धी महामार्गास मुरूम नेण्यास विरोध म्हणून विष प्राशन करणाऱ्या शेतकऱ्याचा अखेर मृत्यू

Spread the love

गावातील ई-क्लास जमिनीचा वापर समृद्धी महामार्गासाठी लागणारा मुरुम काढण्यासाठी करण्यात येऊ नये म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातच विषप्राशन करणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. अनिल चौधरी असं या शेतकऱ्याचं नाव असून ते नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहगावचे रहिवासी आहेत.

राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाकरिता नांदगांव खंडेश्वर तालुक्यातील काही गावामधील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. गावातील अनिल चौधरी या शेतकऱ्याची जमीनदेखील संपादित करण्यात आली होती. परंतु, गावाजवळील ई-क्लास जमिनीचे शासनाद्वारे खोदकाम केले जात आहे. महामार्गाकरिता लागणारा मुरूम या जमिनीतून काढण्यात येत आहे. यावर अनिल चौधरी यांच्यासह गावकऱ्यांनी आक्षेप घेतला. त्यांनी यासंबंधीचे निवेदन विभागीय आयुक्तांनादेखील दिले. परंतु, जमिनीतून मुरूम काढण्याचे काम थांबले नव्हते. त्यामुळे चौधरी प्रचंड संतापले होते.

याच मागणीचे निवेदन अनिल चौधरी यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना दिले. त्यानंतर चौधरी अभ्यागत कक्षात आले. यावेळी त्यांनी विष प्राशन करण्यासोबतच स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु, याठिकाणी हजर असलेल्या सुरक्षारक्षकांनी त्यांना आत्महत्या करण्यापासून रोखले. चौधरी यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आज दुपारी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गाडगनेगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!