Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

वायू चक्रीवादळ: मुंबई, कोकणात उद्या वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

Spread the love

वायू चक्रीवादळ अधिक तीव्र झालं असून हे वादळ आज सायंकाळी साडेपाच वाजता मुंबईपासून ४१० किलोमीटर सागरी अंतरावरून गुजरातच्या दिशेने सरकले असल्याची माहिती देतानाच उद्या (बुधवारी) मुंबई व कोकणात गडगटाट व वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांत बुधवारी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

मुंबई, ठाण्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडू शकतात, तर रायगड, रत्नागिरी येथे सरींची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र वायू वादळामुळे राज्यातील मान्सूनवर परिणाम होऊन राज्यात सर्वदूर मान्सून आगमनासाठी पुढील आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागू शकतो, असे प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले. वायू चक्रीवादळ पुढे निघून गेल्यानंतरही कोकण किनारपट्टीवर सातत्याने पाऊस असल्याने या मान्सूनपूर्व सरी असल्याचे म्हणता येईल. मात्र हा मान्सूनपूर्व पाऊस सध्या महाराष्ट्राच्या अंतर्भागात दिसण्याची शक्यता नाही.

वायू चक्रीवादळाने आर्द्रता खेचून घेतल्याने मान्सूनचा प्रवास आणखी रेंगाळला आहे, असे होसाळीकर यांनी पुढे नमूद केले. अरबी समुद्रात ‘लक्षद्विप’कडून गुजरातकडे निघालेले वायू चक्रीवादळ मंगळवारी सायंकाळी कोकणच्या किनारपट्टीपासून जवळपास ३५० किमीवर होते. त्यावेळी दहा चिनी व्यापारी जहाजे त्यात सापडली. प्रचंड खवळलेल्या समुद्रात त्यांना मार्गक्रमण करणे अशक्य झाल्याने त्यांनी मदतीसाठी संदेश पाठवला.

मुंबईच्या समुद्री बचाव नियंत्रण कक्षाला (एमआरसीसी) हा संदेश मिळताच ही जबाबदारी रत्नागिरीत तैनात असलेल्या तटरक्षक दलाकडे सोपविण्यात आली. तटरक्षक दलाने तात्काळ युद्धनौका पाठवून या सर्व जहाजांना रत्नागिरी बंदरात सुखरुप आणले. वायू चक्रीवादळाचा जोर कमी होईपर्यंत व समुद्र सामान्य होईपर्यंत ही जहाजे आता रत्नागिरीतच थांबणार आहेत. त्यांच्यावर तटरक्षक दलाची देखरेख आहे.

वायू चक्रीवादळ १३ जून रोजी सकाळी गुजरातमधील पोरबंदर आणि वेरावल किनारपट्टीवर धडकू शकते. त्यावेळी वाऱ्याचा वेग ताशी १३५ किमी इतका राहू शकतो, असेही होसाळीकर यांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!