सेना नेत्यांच्या मते समझौता असा आहे कि , राज्याचे मुख्यमंत्री पद अडीच -अडीच वर्षाचे असे ठरलेय…

Spread the love

लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावेळीच महाराष्ट्रात युतीचे सरकार आल्यास मुख्यमंत्रीपद अडीच अडीच वर्षासाठी असेल हे निश्चित झाले होते, असे शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी स्पष्ट केले. युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी ट्विटवरून शिवसेना-भाजपमध्ये प्रत्येकी अडीच वर्षाचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे म्हटले होते. सरदेसाई यांच्या या ट्विटवरून राज्यात राजकीय खळबळ उडाली होती. त्यावर आता शिवसेनेकडून देखील शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत जर पुन्हा युतीची सत्ता आली तर मुख्यमंत्रीपद प्रत्येकी अडीच वर्षासाठी असेल.

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचाच मुख्यमंत्री असेल अशा वल्गना भाजप नेत्यांकडून अमित शहा यांचे नाव पुढे करून करण्यात येत असल्या तरीही शिवसेनेचे कार्यध्यक्ष उद्धव ठाकरे आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात निर्णय झाला आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपचा प्रत्येकी अडीच-अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री असेल. जे लोक हा फॉर्म्युला निश्चित करताना उपस्थित नव्हते त्यांनी स्वार्थासाठी युती तोडण्याचा प्रयत्न करु नये, असे सरदेसाई यांनी ट्विटवर म्हटले होते. सरदेसाई यांच्या या निर्णयावर भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण शिवसेनेच्या प्रवक्त्या कायंदे अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्याला दुजोरा दिला आहे. राज्यातील युती सरकारमध्ये अडीच वर्षाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. यात कोणतीही नवी गोष्ट नाही. लोकसभा निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात यासंदर्भात निर्णय झाला होता. भाजप नेत्यांना याची माहिती आहे की नाही हे तेच सांगू शकतील, असेही कायंदे म्हणाल्या.

सध्या राज्यातील युती सरकारचे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. राज्यात यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान निवडणुका होण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या २८८ जागांपैकी भाजपकडे सर्वाधिक १२२ जागा आहेत. तर शिवसेनेकडे ६३ जागा आहेत. विरोधी पक्षात काँग्रेकडे ४२ तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे ४१ जागा आहेत. लोकसभा निवडणुकीत होय नाही करत अखेर भाजप-शिवसेना यांची युती झाली होती. दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे त्याचा फायदा देखील युतीला मिळाला. भाजपने २३ जागा तर शिवसेनेने १८ जागांवर विजय मिळवला होता. राज्यात विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रवादीला ४ तर काँग्रेसला १ जागा मिळाली होती. या पार्श्वभूमीवर भाजप सध्या तरी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर दावा करून आपल्याकडे राज्याचे लक्ष वेधून घेत आहे एएवढे मात्र खरे.

आपलं सरकार